पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचना : जि. प. व पं. स. सदस्य करणार पाहणी
सभापती सिद्धेश रावराणे यांची माहिती
वैभववाडी (प्रतिनिधी) :
पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार वैभववाडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांचा आढावा घेण्यासाठी विशेष पाहणी दौरा 1 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे.
पंचायत समिती सभापती सिद्धेश रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
25 ऑगस्ट रोजी सभापती सिद्धेश रावराणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पंचायत समितीच्या आढावा बैठकीत जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पंचायत समिती सभापती, उपसभापती, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गटशिक्षणाधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी पदाधिकारी व अधिकारी तालुक्यातील एकूण 75 जिल्हा परिषद शाळांना प्रत्यक्ष भेटी देऊन सुविधांची पाहणी करणार आहेत.
या पाहणीदरम्यान वर्गखोल्यांची संख्या व त्यांची सद्यस्थिती, शाळेतील शौचालय व मुतारीची सुविधा, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्प, सौरऊर्जा पॅनेल, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पाण्याची टाकी, वॉटर फिल्टर आदी विविध भौतिक सुविधांची तपासणी करण्यात येणार आहे. तसेच भविष्यात शाळांना आवश्यक असलेल्या अतिरिक्त सुविधांचाही आढावा घेतला जाणार आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी प्रत्येकी पाच शाळांची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी शाळांमध्ये आवश्यक त्या भौतिक सुविधा असणे गरजेचे आहे. या पाहणीच्या माध्यमातून शाळानिहाय आवश्यक सुविधांची निश्चित माहिती प्रशासनाला उपलब्ध होणार आहे.
पाहणी दौरा पूर्ण झाल्यानंतर तयार करण्यात आलेल्या सविस्तर अहवालाच्या आधारे प्रत्येक शाळेला आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सभापती सिद्धेश रावराणे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

