कळे येथे जिल्हा वार्षिक योजनेतून १०० टक्के अनुदानावर मका बियाणे वाटप; ६० पशुपालकांचा सहभाग
*प्रतापसिंह काळे*
*पन्हाळा प्रतिनिधी :*
पशुधनाच्या पोटाची सोय झाली, तर शेतकऱ्याच्या संसाराला आधार मिळतो.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा हा महत्त्वाचा कणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कळे येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयात पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर मका वैरण बियाण्याचे वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या शोभा युवराज बेलेकर यांच्या हस्ते हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.पशुधन सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी चाऱ्याचा प्रश्न हा केवळ जनावरांच्या खाद्याचा प्रश्न नसून त्यांच्या रोजीरोटीशी जोडलेला आहे. पावसाळ्यात हिरव्या वैरणीची उपलब्धता वाढविण्यासाठी शासनाच्या माध्यमातून देण्यात येणारे वैरण बियाणे पशुपालकांसाठी निश्चितच दिलासा देणारे ठरत आहे. या पार्श्वभूमीवर कळे येथे झालेल्या या उपक्रमाला पशुपालकांनी चांगला प्रतिसाद दिला.
कार्यक्रमास सुमारे ६० पशुपालक उपस्थित होते. यावेळी युवराज बेलेकर, संजय पाटील यांच्यासह विविध पदाधिकारी व पशुपालक उपस्थित होते.यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रणजीत कृष्णात वेदपाठक यांनी पशुपालकांशी संवाद साधत जनावरांच्या आहारातील वैरणीचे महत्त्व स्पष्ट केले. पौष्टिक व हिरवी वैरण उपलब्ध झाल्यास जनावरांचे आरोग्य, दूध उत्पादन आणि पशुपालनातून मिळणारे उत्पन्न यावर सकारात्मक परिणाम होतो, याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच जनावरांना वेळेवर विविध रोगांचे लसीकरण करून घेणे आवश्यक असल्याचे सांगून पशुपालकांनी पशुधनाच्या आरोग्याबाबत अधिक जागरूक राहण्याचे आवाहन केले.
ग्रामीण भागात पशुपालन हे अनेक कुटुंबांच्या अर्थचक्राला हातभार लावते. त्यामुळे शासनाच्या योजना केवळ कागदावर न राहता त्या थेट पशुपालकांच्या दारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. कळे येथे झालेल्या वैरण बियाणे वाटपातून शासनाच्या योजनेचा थेट लाभ पशुपालकांना मिळाला असून, मक्याच्या हिरव्या वैरणीतून पशुधनाच्या आरोग्यासोबतच शेतकऱ्यांच्या आर्थिक जगण्यालाही हिरवा आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

