चिपळुणातील मिरजोळी ग्रा.पं.चे लघु पाटबंधारे विभागाला निवेदनचिपळूण (प्रतिनिधी) : वाशिष्ठी नदीत चार ठिकाणी निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे मिरजोळी, शिरळ, कोंढे गावांच्या पाणी योजना अडचणीत आल्या आहेत.
या गावांना उन्हाळ्यात मचूळ, खारट, गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने रोगराई पसरत आहे. त्यामुळे हे अडथळे तातडीने दूर करा, अशी मागणी मिरजोळी ग्रामपंचायतीने निवेदनाव्दारे लघु पाटबंधारे विभागाकडे केली आहे, तसे न केल्यास १५ ऑगस्ट रोजी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. याला कोंढे व शिरळ ग्रामपंचायतींसह ग्रामस्थांना पाठिंबा असल्याने यंत्रणेची धावपळ उडाली आहे.
मिरजोळी ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या गावाच्या पाणी योजनेची जॅकवेल वाशिष्ठी नदीच्या किनारी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या जॅकवेलधून ग्रामपंचायत गावाला पाणी पुरवते. असे असताना २०२१ साली आलेल्या महापुरानंतर शासनाने आपल्या विभागाच्या माध्यमातून वाशिष्ठी नदीतील गाळ काढण्यास सुरूवात केली आहे. हे काम करीत असताना चिपळूण शहरातील पेठमाप जुनी फरशी भागात नदीचा प्रवाह खेड-लोटे एमआयडीसीच्या जॅकवेलकडे जाणूनबुजून वळवण्यात आला आहे. त्यामुळे त्या बाजूच्या नदीपात्राला कोळकेवाडीतून वीज निर्मितीनंतर येणारे सर्व पाणी जात असून नदीची दुसरी आमच्या जॅकवेलकडे येणारी बाजू कायम कोरडी दिसून येते. आपल्या विभागाने चिपळूण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी नगरपरिषदेने खेर्डी-माळेवाडी येथे बांधलेला बंधारा यावर्षी आणखी खोल व उंच करून दिला आहे. त्यामुळे पाणी अडण्याचे प्रमाण वाढते आहे.
नगरपरिषदेने मुरादपूर भागासाठी पेठमाप येथील जुन्या फरशीवरुन काही महिन्यांपूर्वी नळपाणी योजनेची पाईपलाईन नेली आहे. तिला सरंक्षण म्हणून काही फुटाचे काँक्रीटीकरण केले आहे. यामुळेही पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होत आहे. तसेच आपल्या विभागाने मिरजोळी-जुवाडबेट उक्ताड परिसरात गाळाची वाहतूक करण्यासाठी नदीत रस्ता तयार केला आहे. हे काम संपले असतानाही तो रस्ता तसाच ठेवला असल्याने नदीचे दोन भाग झाले असून पाण्याचा प्रवाह दुसच्या बाजूलाच जाते आहे.
या सर्वाचा परिणाम म्हणून मे महिन्यात मिरजोळीसह तीन गावातील ग्रामस्थांना खाडीच्या भरतीचे गढूळ, मचूळ व खारट पाणी पुरवावे लागते. याचा परिणाम लहान मुले, वयोवृध्द याच्या आरोग्यावर होत असून विविध आजार आमच्या भागात पसरत आहेत त्यामुळे एमआयडीसी, नगरपरिषद यांच्या फायद्यासाठी वळवण्यात आलेला वाशिष्ठी नदीचा प्रवाह व पूर्वापार असलेल्या नदीच्या पाण्याचा प्रवाह थांबवण्यासाठी निर्माण करण्यात आलेले अडथळे दूर झाले नाहीत तर आमच्या पाण्याचा प्रश्न दरवर्षी उन्हाळ्यात गंभीर होणार आहे. त्यामुळे हे अडथळे तातडीने दूर करावेत अन्यथा १५ ऑगस्ट रोजी तिन्ही गावातील ग्रामस्थ व ग्रामपंचायती आपल्या कार्यालयासमोर उपोषण करतील, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आता यंत्रणा खडबडून जागी झाली असून ग्रामस्थांना चर्चेला बोलावण्यात आले आहे.
चौकट-
पाण्यासाठी मोठा लढा उभारु
ग्रामस्थांना चांगले पाणी देणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे तिन्ही ग्रामपंचायती मिळून आम्ही लढा देत आहोत. काहींच्या फायद्यासाठी जाणूनबुजून वाशिष्ठी नदीत तयार केलेले अडथळे दूर करावेच लागतील. अन्यथा पाण्यासाठी आम्ही मोठा लढा उभारु.
-विनोद पवार, प्रशासक ग्रामपंचायत मिरजोळी

