Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वेंगुर्ले येथे २ मे रोजी 'रथ समतेचा' समूहगायन स्पर्धेचे आयोजन.

वेंगुर्ले येथे २ मे रोजी 'रथ समतेचा' समूहगायन स्पर्धेचे आयोजन.

वेंगुर्ले : प्रतिनिधी

स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणारे महात्मा ज्योतिबा फुले, देशाला सक्षम असे संविधान देऊन आधुनिक भारताचे खरे शिल्पकार ठरलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांची पुण्यतिथी, महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून वेंगुर्त्यात २ मे रोजी रथ समतेचा' समूहगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचाने विविध समविचारी संस्थांच्या सहयोगातून आयोजित केलेली ही स्पर्धा वेंगुर्ले कॅम्प येथील बॅ. नाथ पै समुदाय केंद्रात दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे.

स्पर्धेतील प्रथम तीन विजेत्या संघांना रोख ६००१, ४००१, २००१ रुपये, चषक व प्रमाणपत्र तसेच पाच उत्तेजनार्थ क्रमांकांना रोख १ हजार रुपये व प्रमाणपत्र असे पारितोषिक देण्यात येईल. प्रथम नावनोंदणी करणाऱ्या १२ संघांनाच स्पर्धेत सहभाग देण्यात येणार आहे. स्पर्धा खुली असल्याने कोणत्याही भागातील संघांना प्रवेश देण्यात येईल. स्पर्धेसाठी कोणत्याही प्रकारचे प्रवेशशुल्क आकारण्यात आलेले नाही. संघात संगीत साथीदार सोडून कमीतकमी सहा सदस्य असावेत. संघांनी स्वतःची पारंपरिक संगीतसाथ स्वतः आणयची आहे. गीत सादरीकरणासाठी कमितकमी ४ तर जास्तीत जास्त ८ मिनिटांचा वेळ देण्यात येईल. पुरोगामी महाराष्ट्राचे दर्शन घडविणारी समतेची गाणी किंवा राष्ट्रभक्ती जागृत करणाऱ्या गीतांचे समूहगायन सहभागी संघांना करावे लागणार आहे. आंबेडकरी चळवळीतील गीतांनाही प्राधान्य देण्यात येईल.

समर्पण फाऊंडेशन सिंधुदुर्ग, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी शाखा वेंगुर्ले, भारतीय बौद्ध महासमा शाखा वेंगुर्ले, विनोदिनी आत्माराम जाधव फाऊंडेशन वेंगुर्ले, बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हल्पमेंट, यसार फाऊंडेशन सिंधुदुर्ग, भारतीय विद्यार्थी मोर्चा शाखा वेंगुर्ले आदी संस्थांच्या सहयोगाने ही स्पर्धा होणार आहे. माध्यमिक विद्यालये, महाविद्यालये, महिला संघ, पुरोगामी विचारसरणीचे संघ, आंबेडकरी चळवळीतील संघांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे. स्पर्धेबाबत अधिक माहिती व नावनोंदणीसाठी महेंद्र मातोंडकर ९१५८८८१६१८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांनी केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital