देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली माळवाडी येथील पालकर फार्म्सचे सर्वेसर्वा व प्रसिद्ध उद्योजक श्री. विजय पालकर आणि सौ. भारती पालकर यांनी पालकर फार्म्स हाऊस येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या सेंद्रिय शेती अभियानाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
यावेळी मान्यवरांनी सेंद्रिय शेतीचे महत्व आपल्या मनोगतातून उपस्थित शेतकऱ्यांना समजावून सांगितले.
शेतीतज्ज्ञ आनंद बोंद्रे यांनी सेंद्रिय शेतीबाबत उदाहरणे देत अतिशय चांगल्याप्रकारे माहिती दिली. कोकणातील शेती एकाच प्रकारची असू नये. साग, बांबू, खैर एकाचवेळी लावले तर चांगले उत्पन्न मिळेल. प्रत्येक पिकाचा अभ्यास आपल्याला असला पाहिजे. शेतीत काँम्बीनेशन असले पाहिजे. निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेवून आपण शेतीचे काम करायला हवे. नियोजन करून विविध प्रकारची पिके घेतली तर चांगले उत्पन्न मिळते. असेही सांगितले. यावेळी मंडळ अधिकारी श्री. फाटक यांनी शासनाच्या अनेक योजनांबाबत माहिती दिली तसेच सेंद्रिय शेती आणि ग्रुप शेती याबाबत माहिती देऊन शेतकऱ्यांनी एकट्याने शेती करण्यापेक्षा ग्रुप शेती केल्यास अधिक उत्पादन निघू शकते त्याचे अनेक दाखले दिले.
गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या तसेच कृषी विभागाच्या यादव यांनीही शासनाच्या अनेक योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन करून अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा असेही सांगितले. निवृत्त नायब तहसीलदार सुधीर यादव यांनीही मार्गदर्शन केले. सौ. भारती पालकर यांनी आपल्या मुंबई ते देवरूख विघ्रवली पर्यंतच्या प्रवासाबाबत माहिती दिली. पालकर फार्ममध्ये सीनियर सिटीजनच्या कक्षाची स्थापना का केली याबाबत माहिती दिली. शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती का करावी याबाबतही माहिती दिली. पालकर फार्म्सचे सर्वेसर्वा श्री विजय पालकर यांनीही शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन केले. पालकर फार्म येथे कॉफीचीही लागवड करण्यात आल्याचे सांगितले. जि. प. सदस्य प्रमोद अधटराव यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. रानभाज्या बाबत पी. एच. डी. करणारे आशिष माईनकर यांनी रानभाज्यांच्या ८० प्रकाराबाबत माहिती देऊन अनेक वेगवेगळ्या भाज्यांचे बियाणे व रोपे यांचे आपण संवर्धन करत असल्याची माहिती दिली.
या सेंद्रिय शेती अभियानाबाबत मार्गदर्शन करताना सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते यांनी अनेक विषयांबाबत माहिती दिली आज शेतकऱ्यांनी खर्च आणि उत्पन्नाची बेरीज करूनच शेती करावी मग ती सेंद्रिय असो व अन्य कशी असे आर्ते म्हणाले. कोकणात शेती बाबत शेतकऱ्यांमध्ये एवढी उत्सुकता नसल्याने नाराजी व्यक्त केली बांबूच्या शेतीतून फार मोठे उत्पन्न मिळू शकते असेही सांगितले एकदा लागवड केली की पुन्हा त्याच्यावर खर्च करायची गरज लागत नाही. बांबू तोडणी ही बांबू खरेदी करतो तोच करतो .पन्नास रुपयांच्या बांबूमध्ये हस्त कौशल्यातून शंभर दोनशे रुपये ते पाच हजार रुपये पर्यंत उत्पन्न मिळू शकते असेही या वेळीं दाखले दिले. कोकणातील युवक दिवा गाडीने मुंबईत जातो आणि पोटापुरतीच नोकरी करतो त्यापेक्षा कोकणातील लाल मातीत उत्पन्न घेऊन लाखो रुपये कमवू शकतो असे आर्ते म्हणाले. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना असून पाच लाखापर्यंतचे अनुदानित उद्योग असूनही कोकणातील शेतकरी अशा योजनांकडे फिरकतही नाही आणि माहिती ही घेत नसल्याने त्यांनी खंत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन श्रीकृष्ण पालेकर यांनी केले. यावेळी निलेश चव्हाण यांच्यासह शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.

