Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
वीज खांबातून प्रवाहित झालेल्या विजेचा धक्का लागून दोन गाईंचा मृत्यू

वीज खांबातून प्रवाहित झालेल्या विजेचा धक्का लागून दोन गाईंचा मृत्यू

मालवण शहरातील मेढा येथील दुर्दैवी घटना

मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरातील मेढा येथे लोखंडी वीज खांबाला स्पर्श झाल्या नंतर विजेचा धक्का लागून दोन गायींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेमुळे वीज वितरणच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.

गुरुवारी सकाळी मेढा येथील शंकर मंदिरनजीकच्या रस्त्यावरील मॉन्टी तारी यांच्या घरानजीक असलेल्या वीज खांबा जवळून दोन गायी जात असताना वीज खांबाला त्यांचा स्पर्श झाला. गंबीर बाब म्हणजे वीज खंबातून वीज प्रवाहित होतं होती. त्याचा धक्का दोन्ही गायीना लागून दोन्ही गायी जागीच मृत्युमुखी पडल्या. यातील एक गाय गाभण असल्याचे समजते. ही घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी याबाबत स्थानिक नगरसेविका मेघा सावंत यांना माहिती दिली. मेघा सावंत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वीज वितरण विभागाला याबाबत माहिती दिल्यावर त्या भागातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी वीज कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. जिल्हा विद्युत निरीक्षक यांना याबाबत माहिती देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरु करण्यात आली

यावेळी स्थानिक नागरिक तसेच नगरसेविका मेघा सावंत यांनी या मृत गायींच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही मालक सापडून आला नाही. त्यामुळे नगरसेविका मेघा सावंत यांनी नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, आरोग्य सभापती पूनम चव्हाण, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर आणि वीज अभियंता यांना कल्पना दिली.मृत गायींना दफन करण्याबाबत संमती घेतली. नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पाचरण करण्यात आले. यावेळी स्थानिक नागरिक, स्वच्छता कर्मचारी आणि जेसीबीच्या साहाय्याने मृत गाई ट्रॅक्टर मध्ये भरून दफन करण्यासाठी नेण्यात आले.

या कार्यात नगरपालिकेचे स्वच्छता मुकादम आनंद वळंजू, स्वच्छता मुकादम बाळकृष्ण जाधव, स्वच्छता कर्मचारी जगन्नाथ पिंगुळकर, सदाशिव मालवणकर, महेश कोळंबकर, पवन धुरी, ट्रॅक्टर चालक मंदार तांडेल, जेसीबी चालक रवी राठोड तसेच स्थानिक नागरिक राजेश तारी, प्रसाद मोंडकर, लीलाधर ढवळे, राजु डिंगणकर, राजेश वाघ, विशाल आचरेकर, मॉन्टी तारी, दिलीप आचरेकर आदी व इतर सहभागी झाले होते.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Digital