Saturday, 19 Sep, 7.40 pm प्रहार कोकण

होम
. अन् त्या' मृतदेहावर दांडी स्मशानभूमीतच अंत्यसंस्कार !

कोरोनाचा मृतदेह असल्याने स्थानिकांनी केला होता विरोध

मालवण | कुणाल मांजरेकर
शहरातील दांडी आवार स्मशानभूमीत स्थानिक मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास शनिवारी स्थानिकांनी विरोध दर्शवल्याने पुन्हा एकदा येथे गोंधळ निर्माण झाला. मात्र नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर, बांधकाम सभापती यतीन खोत आणि माजी नगरसेवक लीलाधर पराडकर यांच्या मध्यस्थीनंतर स्थानिकांनी सामंजस्याची भूमिका घेतल्याने आरोग्य विभागाचे नियम, निकषांचे पालन करत ओरोस येथून बंदिस्त स्वरूपात आणलेल्या मृतदेहावर दुपारी याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

शहरातील भरड येथील एका कोरोना बाधित जेष्ठ नागरिकाचा शनिवारी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेह मालवण येथे आणून अंत्यसंस्कार करण्याची मागणी केली. यानंतर त्या कुटुंबाची पारंपरिक स्मशानभूमी असलेल्या दांडी आवार (बाजारपेठ) स्मशानभूमीत त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी प्रशासन आणि भरड येथील रहिवाशांनी सुरू केली. मात्र या अंत्यसंस्काराला स्थानिक नागरिकांनी विरोध दर्शवला. काही दिवसांपूर्वी कुंभारमाठ येथील कोरोनाच्या दोन मृतदेहांवर येथे अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांनी विरोध केला होता. त्यामुळे पुन्हा एकदा स्थानिक मृतदेह असताना देखील पुन्हा एकदा येथे विरोध सुरू झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी बांधकाम सभापती यतीन खोत आणि माजी नगरसेवक लीलाधर पराडकर यांनी नागरिकांची समजूत काढत गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, मुख्याधिकारी जयंत जावडेकर हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उपस्थित नागरिकांशी चर्चा करत त्यांचे गैरसमज दूर केले. त्यानंतर नागरिकांनी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास सहमती दर्शवली. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार अंत्यसंस्कारानंतर स्मशानभूमी परिसर फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्याचे प्रशासनाने मान्य केले. जिल्हा रुग्णालयात सर्व प्रक्रिया पूर्ण करत नातेवाईकांनी दुपारी मृतदेह ताब्यात घेतला.
कोरोना खबरदारी पाळत बंदिस्त स्वरूपातील मृतदेह सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास शववाहिनीतून मालवणात आणण्यात आला. त्यानंतर सुरक्षा उपाययोजना करत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यापुढे फक्त स्थानिक मृतदेहावर अंत्यसंस्कार

यापुढेही स्थानिक स्मशानभूमीशी संबंधित मृतदेह असेल तरच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास आमची सहमती असेल. मात्र बाहेरील मृतदेहावर याठिकाणी अंत्यसंस्कार करू देणार नाही, अशीही भूमिका स्थानिकांनी जाहीर केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top