बांदा | प्रतिनिधी :
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जर्नालिस्ट फाउंडेशन यांच्या वतीने राज्यभरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या अलौकिक कार्याप्रती दिला जाणारा यावर्षीचा नवदुर्गा सन्मान पुरस्कार २०२१ शैक्षणिक क्षेत्रातील कार्याबद्दल बांदा केंद्रशाळा नं.१ प्रशालेच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका सरोज नाईक यांना वितरित करण्यात आला.
या कार्यक्रमाला बांदा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष निलेश मोरजकर, बांदा नवभारत संस्थेचे सचिव शरद नाईक, केंद्रप्रमुख संदीप गवस, उपशिक्षक जे. डी. पाटील, स्वाती पाटील आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले दीड वर्षाहून अधिक काळा शाळा बंद असताना मुख्याध्यापिका सरोज नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बांदा केंद्रशाळेत आॅनलाईन स्पर्धात्मक उपक्रमांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली होती. तसेच या कालावधीत चार लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव शाळेमध्ये करून विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. तसेच सामाजिक कार्यातही त्या नेहमीच अग्रेसर असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सदर पुरस्कारासाठी निवड झाली होती.
सरोज नाईक यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांनी शाळा भेटी वेळी बांदा शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज नाईक यांचे अभिनंदन केले.

