Thursday, 22 Apr, 12.40 pm प्रहार कोकण

होम
सिंधुदुर्गचे माणिकमोती.!- कथाकार आणि कवी आ.ना. पेडणेकर आणि अनुवादक प्रा. शरयू पेडणेकर

डाॕ. बाळकृष्ण लळीत

'मुंबयमधी बाॕब फुटतत
लोकां बोलतत कायमाय
आपुनकडून खुश खबरी
मेळ्ळी नाय.
पोस्टामधी खत तुमचां
जळलां तर नाय मां?
उधर जिवाक सामाळून -हवा
…………………………..


'कोकणातील हमीदा एसटीडी वरून'ही मालवणी मिश्र हिंदी बोलीतील गाजलेली कविता तुम्हाला आठवत असेल ! कोणी लिहिली कविता ?
ती आहे कविवर्य आ. ना. पेडणेकर यांची .
अधिष्ठानच्या दिवाळी १९९८च्या अंकात ते अस्सल मालवणीत आपल्याला भेटतात. वि. कृ. नेरूरकर,चंद्रकांत खोत, नारायण पेडणेकर , महेश केळुसकर यांच्यानंतर खरा-खुरा मालवणी कवी मला दिसला तो आ. ना. पेडणेकर यांच्या कवितेत .त्यांची
'कितीक वर्सा'आपण पूर्ण वाचू म्हणजे 'आना'कसे पुरेपुरं मालवणी पाणी होते हे आपल्या सहजपणे ध्यानी येईल.

'कितीक वर्सा नाय लागलो मुलकामधलो न्हिमरो वारो
कितीक वर्सा नाय घातलय पांदीत्सून कुकारो
खाडी करूची पार आमी अगदी नागड्यांनी
माशे धरूचे रात्रीदेकील खाडीत आक्यांनी
मुळे काढूचे पुळणीत्सून कोयत्यांच्या टोकांनी
करपां फोडून भाजून खाल्ली कालवां बचक्याएवढी
आता नाय दिसनां शेगुलमाका हिरव्या पंखांचो
आता नाय आठव पडकळणीच्या फुलातल्या मधाचो
झणझणीत तिरफळाशिवाय निस्त्याकाचां नाय अडनां
सुको बांगडो कोनी भाजलो तर तोंडाक पानी नाय सुटनां धैकाल्यातल्या संकासुराची गंमत आता नाय वाटनां
पिंपळावरचो देवचार आता भय नाय घालनां
गिमामधली उक्षीची नक्षी मनात आता नाय फुलनां
करवंदांची ओटांका, काट्यांची बोटांका यादच रौली नाय आता
वांगडी गेले खैसर खैसर ठावठिकानो नाय गावना मियांदिकील नाय रौलय तेवाचो, काय करूचा …
लिवना बिवना ?
कोनी वांगडी शेतात खपले, संपात सरले
उरले बापडे पोटापाटी आपनाकसुद्धा इसरान गेले
शेळ्यांतला पानी, मचूळ पानी बावीचां गोडच दोनय
तेव्हा होती - चवच गेली कसली गानी ? कसली कानी ?'
एका कवनातून आना
अख्खा मालवणी मुलुख व्यापून टाकतात.
(पण अभ्यासक्रमात आमी तेंका घेवचव नाय..आमका ते म्हायतच नाय. ) असो,
++
'माझ्या ' मालवणी साहित्य स्वरूप आणि चिकित्सा ' या पीएच .डी. प्रबंधाचे परीक्षक व पदवीनंतर भरभरून कौतुक करणारे कविवर्य आ.ना. पेडणेकर आणि ज्येष्ठ अनुवादक शरयू पेडणेकर यांच्या कार्यकर्तृत्वाची ओळख आज करून घेऊया.
माझ्या प्रबंधात मी त्यांच्या
कथांमधील मालवणी संवादाचा अभ्यास केला होता.त्यांनी मला एक पत्रही पाठवलेले आहे ते मी जपून ठेवले आहे.
२७ आॕक्टोबर१९९०साली सावंतवाडी येथे सिंधुदुर्ग जिल्हा आरती साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते . तेव्हा मी पुणे विद्यापीठात शिकत होतो .पण संयोजक विद्याधर भागवत यांनी मला एका परिसंवादासाठी वक्ता म्हणून निमंत्रित केले होते आणि अवघ्या पंचवीशीतील मला ज्येष्ठ साहित्यिक नवेकथेचे एक शिल्पकार गंगाधर गाडगीळ ,डाॕ. प्रल्हाद वडेर व प्रा. आ.ना. पेडणेकर यांच्या सोबत बसण्याची संधी दिली होती .(सोबतचे छायाचित्र) वास्तविक मी तेव्हा तेथे बसण्याच्या योग्यतेचा नव्हतो पण काळ वयापेक्षा अभ्यास गुण पहाणारा होता म्हणून मला या सर्वाच्या साक्षीने प्रथमच मालवणी साहित्यावर बोलण्याची संधी मिळाली. तेव्हा मी प्रा. आ.ना. पेडणेकर सरांना पाहिले. तेव्हा थोडे-फार बोलणे झाले होते. मालवणीचा माझा एकाकी प्रवास तेव्हापासून त्यांना माहित होता.
परवाच त्यांच्या पत्नी दि १७ एप्रिल २०२१ रोजी शरयू पेडणेकर यांचे वयाच्या ९६व्या वर्षी अलिबाग येथे निधन झाले.
या दोन्ही सिंधुरत्नांविषयी अनंत देशमुख यांनी लिहिले आहे ते माझ्या एम. फिल.च्या मालवणी नाटकांवरील प्रबंधिकेचेही परीक्षक होते.
मालवणी बोली व संस्कृती यावर दोघांनी भरभरून प्रेम केले. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते आवर्जून मालवणला येत .
आ.ना. पेडणेकर सर-
'कविता आ.ना. पेडणेकरांच्या' हा पद्मगंधा प्रकाशन'ने २००६ साली त्यांचा कवितांचा संग्रह प्रकाशित केला आहे .
या संग्रहाच्या प्रस्तावनेत आ. ना. पेडणेकर यांच्याविषयी व त्यांच्या लेखनकार्याविषयी डाॕ. अनंत देशमुख यांनी खूपच अभ्यासपूर्ण व आत्मियतेने लिहिले आले.
हा परिचय वजा दीर्घ स्मृतीलेखच मी संपादन करून येथे सादर करत आहे.
यातील बहुतेक लेखन
डाॕ, अनंत देशमुख यांचे आहे हे वाचकानी ध्यानी घ्यावे ; कारण हे इतके अभ्यासपूर्ण व आत्मियतेने लिहिले आहे की,नवे लिहिण्याची मला गरज वाटत नाही.

डाॕ. अनंत देशमुख लिहितात-
'इंग्रजी विषयाचे प्राध्यापक म्हणून १९६३-१९६४ च्या सुमारास अलिबागच्या जे. एस. एम. कॉलेजमध्ये ते नोकरीला लागले व ते दीर्घकालानंतर त्या कॉलेजमधून निवृत्त झाले. त्यानंतरचे त्यांचे वास्तव्य मालाड येथे राहिले. दि. ११/८/ २००४ रोजी त्यांचे निधन झाले.
त्या आधी काही दिवसांपूर्वी ते गंभीर आजाराने बिछानाबद्ध झाले होते . महाविद्यालयात शिकवणारे प्राध्यापक म्हणून म्हणून ते विद्यार्थी प्रिय होतेच पण साहित्यिक कवी म्हणून ते परिचित होते.
'त्या वेळच्या प्रतिष्ठित 'सत्यकथा' या वाङ्मयीन मासिकाचे एक लेखक म्हणून ते प्रसिद्ध पावले होते. कथा, कविता, बालगीते आणि समीक्षापर टिपणे त्यांनी लिहिलेली होती. त्यांची 'स्पुटनिक' ही कथा तर जर्मन भाषेत भाषांतरित झाली होती.'
++
अनंत देशमुख पुढे लिहितात-
'ते मुळचे मालवण कोळंबचे. तिथल्या हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम पाहिले. तिथून ते बेळगावला गेले. तिथे त्यांनी शिक्षणशास्त्रातली पदवी घेतली. मग ते मुंबईला आले नि नोकरी करीत त्यांनी एम.ए.चा अभ्यास केला. मालवणचे असल्याने चिं. त्र्यं. खानोलकर, प्र. श्री. नेरूरकर व विद्याधर भागवत यांच्याशी त्यांचा स्नेह होता. 'चिं.त्र्यं. खानोलकरांच्या शोधात' या जया दडकर यांच्या पुस्तकात म्हणूनच पेडणेकर सरांचे उल्लेख येतात. कोकणातील माणसे, त्यांचे स्वभावविशेष, त्यांचे परस्परसंबंध, त्यांची संस्कृती, त्यांची भाषा, कोकणचा निसर्ग यांची उत्कट,तरल व नाट्यपूर्ण चित्रे त्यांनी 'शेलूक', या संग्रहातून रंगवली.पुढे त्यांनी ऐलपोल 'ही लघुकादंबरी महत्त्वाची ठरली.'
१९५५ ते १९६५ या काळात सत्यकथेतून त्यांनी कथा ,कविता व टिपणे प्रकाशित झाली.
++
'आ. ना. पेडणेकर यांची कविता जीवनाची विविध क्षेत्रे स्पर्श करणारी, त्यातील व्यस्तता नि व्यर्थता वाचकांच्या समोर आणणारी, समकालीन समाज जीवनातील -हास पर्व सुरू झाल्याची अनेकविध प्रसंगचित्रे उपहास, उपरोधाच्या सहाय्याने मांडणारी, व यामुळे मानवी जीवनासंबंधी काही मूलभूत प्रश्न पडल्याने अंतर्मुख होऊन चिंतनात्मक बनलेली आहे
अंतर्मुखता नि बहिर्मुखता, चिंतनशीलता नि समाजसन्मुखता, तरल काव्यात्मकता नि समर्थ चित्रदर्शित्व हे त्यांच्या कवितेचे विशेष आहेत.'
संवेदनशील वाचकांना एकाचवेळी आनंद देणारी आणि अस्वस्थ करणारी प्रा. आ.ना. पेडणेकर यांची कविता वाचकांना आपलीशी वाटत असे.
++
कथासंग्रहातील कथांमधून, 'ऐलपैल' या लघुकादंबरीतून समर्थपणे रंगविली. 'शेलूक'ला राज्यपुरस्कार मिळाला. प्रा.मं.वि. राजाध्यक्ष यांच्यासारख्या चिकित्सकाची प्रस्तावना प्रा. गंगाधर गाडगीळ यांच्यासारख्या समर्थ नवकथाकाराला व समीक्षकाला त्यातील वेगळेपण जाणवले होते.
++
' सत्यकथेत त्यांचे लेखन प्रकाशित होत असे की राम पटवर्धन हे त्यांचे स्नेही होते आणि विशेष म्हणजे पटवर्धनांच्या संपादकीय निकषांवर सरांचे लेखन उतरत होते.सरांचे मराठी व इंग्रजी भाषांवरील प्रभुत्व वादातीत होते आणि अनुवादप्रक्रियेविषयी त्यांची दृष्टी तयार होती. शेक्सपीअरच्या कित्येक सुनीतांचे अनुवाद त्यांनी स्वेच्छेने केले होते. टॉलस्टॉयच्या 'वॉर अॅण्ड पीस'चा अनुवाद त्यांनी 'महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळा'करिता केला.
निवृत्तीनंतर ते मुंबईला आले. प्रा. डॉ. सरोजिनी वैद्य मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागाच्या प्रमुख होत्या. तेव्हा त्यांनी सरांच्या अनुवादकौशल्याचा लाभ विभागातीलप्रकल्पांसाठी झाला.
प्रा. गो. वि. करंदीकर यांनी आपले साहित्य-समीक्षेच्या संदर्भातील विचार इंग्रजीमध्ये लिहिले होते. सरांनी ते 'साहित्यमूल्यांची समीक्षा' या शीर्षकाने अनुवादित केले होते.. प्रो. र. धों. कर्वे यांचा या नियतकालिकाशी जवळून संबंध राहिला.'
++
प्रा. अनंत देशमुख यांनी लिहिले आहे..
'१९९६ साली भारतीय भाषा परिषद, कलकत्ता' या संस्थेने 'विसाव्या शतकातील साहित्य' या विषयावर परिसंवाद ठेवले होते. मराठी साहित्याविषयी कथा, कादंबरी व समीक्षा या विषयांवर निबंध सादर करायचे होते. त्यापैकी एक निबंध पेडणेकरसरांनी सादर केला होता.असे काही अपवादात्मक निबंध ते चर्चासत्रांमधून सादर करीत. अत्यंत तीव्र साहित्यनिष्ठा त्यांच्यापाशी होती. जो अभ्यासक्रम शिकवण्याची त्यांच्यावर पाळी येई तो पूर्वतयारीनिशी ते मनःपूर्वकतेने शिकवीत. आल्डस हक्सले यांची 'द ब्रेव्ह न्यू वर्ल्ड', शेक्सपीअरचे 'मॅकबेथ', टॉमस रॉंटिगनचे 'विनस्लो बॉम' ही त्यांनी शिकवलेली काही पुस्तके. त्यांच्या शिकविण्यात तळमळ असे, पण शंका विचारायला आलेल्या विद्यार्थ्यांचे पूर्ण समाधान होईपर्यंत ते विवेचन करीत. अध्यापनाचे काम संपल्यावर ते कॉलेजच्या ग्रंथालयात कटाक्षाने जात नवनवीन पुस्तकांची मागणी करीत. ग्रंथालयातील इंग्रजी विभाग समृद्ध केला. त्यांच्या या ग्रंथप्रेमामुळे त्यांनी अलिबाग येथील सार्वजनिक ग्रंथालयात लक्ष घातले होते . सहकाऱ्यांबरोबर त्यांचे वर्तन अत्यंत खेळीमेळीचे असे. त्यांच्यापाशी उपजतच विनोदबुद्धी होती. समकालीन व्यवस्थेवर, अनिष्ट प्रवृत्तींवर ते विनोदाच्या साहाय्याने प्रकाश पाडीत अथवा आपल्या उपरोधिक शैलीत भाष्य करीत. ते तसे स्पष्टवक्ते होते. परखडपणे बोलत. परंतु त्यामागे त्यांचे वैयक्तिक हितसंबंध गुंतलेले नसत. आयुष्यभर जी जीवनमूल्ये व साहित्यमूल्ये त्यांनी अंगिकारली, त्यांना ते नेहमी प्रमाण मानीत. आपल्या सहकाऱ्यांना ते स्वातंत्र्य देत. एकदा कामाची वाटणी झाली की मग त्यात ते ढवळाढवळ करीत नसत. ते टेबलटेनिस आवडीने खेळत व तेव्हाची त्यांची चपळाई तरुणाला लाजवील अशी असे. '
असे अनंत देशमुख यांनी म्हटले आहे.
++
श्री. ह.मो. मराठे, शरद साटम व प्रा. शंकर सखाराम या त्यांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पहिल्यावहिल्या कृतींच्या अर्पणपत्रिकांमध्ये पेडणेकरसरांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केलेला आढळतो. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये साहित्यविषयक आस्था ते पेरीत असत, नवोदित लेखकाच्या 'लेखक' आदर्श शिक्षक म्हणून पेडणेकरसरांना पुरस्कार मिळाला नसला तरी विद्यार्थ्यांच्या मनात साहित्यविषयक प्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत असत.
++
'साहित्य अकादमी'ने त्यांच्यावर आचार्य अत्रे यांच्या जीवनसाहित्यावर एक पुस्तिका (मोनोग्राफ) लिहिण्याची जबाबदारी सोपवली. अत्र्यांसारख्या चतुरस्र व्यक्तित्वाचा शंभर-सव्वाशे पानांमध्ये सर्वांगीण परिचय करून देणे तसे अवघड काम होते. अत्र्यांचा काळ, तेव्हाचे वाङ्मयीन वातावरण, राजकीय परिस्थिती, नाटक-चित्रपटसृष्टीतील स्थित्यंतरे अनेक साधनसामग्रीचा बारकाईने अभ्यास करून एक नमुनेदार पुस्तक सिद्ध केले आहे.
त्यांचे वाचन चौफेर असायचे. एखादा 'गंभीर व गंमतीदार' विषय सापडला, की त्यावर ते लिहित. समाजातील अंधश्रद्धा व देवभोळेपणावर त्यांचा राग असायचा. यादृष्टीने ते बुद्धिवादीच होते.
++
त्यांच्या पत्नी शरयूवहिनींची सरांना मनःपूत साथ लाभली. साहित्य हा दोघांचा समान विषय राहिला.
'गीतांची शाळा'मधील कुमारगीते, 'निबंधांची शाळा'मधील निबंध हे लेखन त्यांनी केले. त्यांच्या 'रेड 'ग्रीन' या संग्रहातल्या कथा या प्रकारातील आहेत. 'शेलूक' खेरीज 'ऐलपैल व 'गाणीबिणी'ला शासनाचे पुरस्कार मिळाले होते आणि आणीबाणीच्या काळात त्यांच्या 'रेडग्रीन'ला मिळालेला पुरस्कार त्यांनी नाकारला होता. स्वतःच्या मूल्यांवरील त्यांच्या निष्ठा अशा उत्कट होत्या. त्यांचा 'वेडा 'आंबा' तर वेगवेगळ्या भाषांमध्ये केव्हाच गेला आहे.
प्रा.आ. ना. पेडणेकर यांचे वयाच्या अट्ट्याहत्तराव्या वर्षी दि. ११-८-२००४ रोजी निधन झाले.
++
शरयू पेडणेकर-
मूळच्या सिंधुदुर्गच्या (कोळंब) आणि सध्या अलिबाग येथे वास्तव्याला असणाऱ्या सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका शरयू पेडणेकर (९६) यांचे अलिबाग१७-०४-२०२१ रोजी नुकतेच येथे निधन झाले.
हिंदी, इंग्रजीतील उत्तम साहित्य मराठीत आणण्यासाठी त्यानी प्रयत्न केले. प्रा. शरयू पेडणेकर याना साहित्याची मर्मज्ञ जाण होती. हिंदी आणि मराठी भाषांवर त्याचं प्रभुत्व होतं. विभूती नारायण राय यांचं 'कर्फ्यू ' त्यांनी मराठीत आणले.
अनेक पुस्तकांचे अनुवाद त्यांनी केले. त्यांनी अनुवादित केलेले प्रख्यात संगीतकार अनिल विश्वास यांचे शरद दत्त लिखित चरित्र महत्वाचे मानले जाते. कविवर्य डाॕ.
महेश केळुसकर यांनी त्यांच्या आठवणीना नुकताच उजाळा त्यांच्या फेसबुक वाॕलवर दिला आहे.
चौथ्या मालवणी बोली साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कविवर्य
डाॕ.महेश केळुसकर लिहितात-
' आ.ना. पेडणेकर यांची साहित्यनिष्ठा आणि परोपकारी वृत्ती अजूनही अनेकांच्या स्मरणात आहे. माईही तशाच. आपलं लिहिलेलं प्रत्येक अक्षर आ.ना. माईंना वाचून दाखवत. १९६८ साली खूप प्रौढपणी माई आणि आ.ना. विवाहबंधनात बांधले गेले.
आ.ना.११ ऑगस्ट २००४ रोजी निवर्तले आणि ३६ वर्षांचा सहवास संपला. मग थोडे दिवस मालाडला राहून माई अलिबागला आपल्या भाच्यांकडे रहायला गेल्या. अधूनमधून तिकडून फोन करून सगळी कौटुंबिक चौकशी करायच्या. आपण खूप थकत चाललोय,असं सांगायच्या. आ.नां.चं अजून खूप अप्रकाशित साहित्य आहे , ते कसं मार्गी लागणार म्हणून चिंता व्यक्त करायच्या.'
'प्रा. शरयू पेडणेकर यांना अव्वल साहित्याची मर्मज्ञ जाण होती. हिंदी आणि मराठी भाषांवर त्यांचं प्रभुत्व होतं. विभूती नारायण राय यांचं ' कर्फ्यू ' त्यांनी मराठीत आणलं. असे अनेक पुस्तकांचे अनुवाद केले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी अनुवादिलेलं प्रख्यात संगीतकार अनिल विश्वास यांचं शरद दत्त लिखित चरित्र. आ.ना.सरांच्या दहा कथा १९९१ साली, महेश केळुस्कर यांनी आकाशवाणीवर केल्या होत्या. शरयू ताईही पुस्तक परीक्षण वगैरे कार्यक्रमासाठी कधी कधी यायच्या. जुन्या काळात आकाशवाणी थिएटरात बघितलेल्या अनवट सिनेमांच्या आठवणी सांगायच्या.!'
अशा या कोळंब मालवणच्या सिंधुरत्नांची स्मृती कायम राहील यात शंकाच नाही.

थंडीत कोरोना रुग्णांचा संख्येत वाढ होईल का ?

View Results

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Prahaar Konkan
Top