Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
"काळ आला होता पण." अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर झाड कोसळले; २१ जण थोडक्यात वाचले

"काळ आला होता पण." अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांच्या गाडीवर झाड कोसळले; २१ जण थोडक्यात वाचले

Pravah News 1 week ago

कुडाळ: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथील २१ प्रवासी अक्कलकोट येथे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जात असताना आकेरी येथे त्यांच्या धावत्या गाडीवर अचानक एक मोठे आकाशिचे झाड कोसळल्याची भीषण दुर्घटना घडली.

या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले असले, तरी स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व २१ प्रवासी सुदैवाने बालंबाल बचावले आहेत. या घटनेत गाडीचा चालक आणि अन्य एक जण किरकोळ जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, कुडाळ गुढीपूर येथील रहिवासी राजेश सिंगनाथ आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य (एकूण २१ प्रवासी) 'टेम्पो ट्रॅव्हलर' (क्र. MH 48 K 1171) या गाडीने अक्कलकोट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी निघाले होते. ही गाडी सावंतवाडीजवळील आकेरी येथे पोहोचली असता, रस्त्याच्या कडेला असलेले एक मोठे आकाशिचे झाड अचानक चालत्या गाडीवर कोसळले.

झाड थेट गाडीवर पडल्याने वाहनाचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आणि मोठे नुकसान झाले. मात्र, गाडीतील सर्व प्रवासी सुखरूप असून कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही. अपघात घडताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. किरकोळ जखमी झालेल्या चालकाला तातडीने उपचारासाठी सावंतवाडी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक ग्रामस्थांची समयसूचकता

अपघाताचा भीषण आवाज ऐकताच आकेरी येथील स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी कटरच्या साहाय्याने रस्त्यावर आणि गाडीवर पडलेले झाड वेगाने कापून बाजूला केले आणि वाहतुकीसाठी रस्ता मोकळा केला. ग्रामस्थांनी दाखवलेल्या या समयसूचकतेचे आणि मदतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वणव्यांमुळे झाडे होताहेत पोकळ

पावसाळा सुरू होण्यापूर्वी ग्रामीण आणि डोंगरभागात मोठ्या प्रमाणावर वणवे पेटवले जातात. या वणव्यांच्या आगीमुळे रस्त्याशेजारील अनेक झाडे मुळापासून जळतात आणि आतून पोकळ होतात. वरून हिरवीगार दिसणारी ही झाडे आतून कमकुवत झालेली असतात, ज्यामुळे मे महिन्यातील वादळी वाऱ्यात ती अचानक उन्मळून पडतात. आजचा अपघातही अशाच एका जळालेल्या झाडामुळे घडल्याचे समोर आले आहे.

हे वणवे प्रवाशांच्या जीवावर बेतू लागल्याने त्यावर वेळीच नियंत्रण मिळवणे गरजेचे झाले आहे. या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली, तरी वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याशेजारील अशी धोकादायक व जळालेली झाडे तातडीने हटवावीत, अशी मागणी आता नागरिक आणि प्रवाशांमधून केली जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pravah News