Monday, 27 Jul, 4.09 pm Praveen Bardapurkar

विशेष लेख
औरंगाबादचा संडे क्लब

( वरील छायाचित्रात - संडे क्लब'च्या एका अनौपचारिक कार्यक्रमात डावीकडून 'स्वामी' श्याम देशपांडे , सुधीर रसाळ , नानासाहेब चपळगावकर , रा. रं . बोराडे आणि अस्मादिक म्हणजे प्रवीण बर्दापूरकर हो ! )

|| नोंद .९ ||

वृ त्तपत्राच्या धबडग्यात पूर्ण सुटीचे ( sealed holiday ) दिवस तसे कमीच असतात . मी तर रजा वगैरेही फारशा घेतच नसे कारण पत्रकारितेची पूर्ण नशा चढलेली होती , इतकी की झोपेतही बातमी , लेख , मांडणीची स्वप्ने पडत . जून १९९८ पर्यंत बेगम , लेक आणि मी आठवड्यातून एकदाच केवळ रविवारी रात्रीचं जेवण सोबत करत असू . साप्ताहिक सुटीच्या दिवशी , रविवारीही अर्धा दिवस काम करायची माझी पद्धत होती . पूर्ण सुटीचा दिवस किंवा अर्धा रविवार कसा घालवायचा हा प्रश्न कधी पडला नाही कारण नागपूरचं सांस्कृतिक वातावरण खूपच भरजरी होतं.आहे . लेखक , कवी , विचारवंत यांच्या सहवासात वेळ कसा जातोय हे समजत नसे . भाऊ समर्थ , अरुण मोरघडे , ग्रेस , महेश एलकुंचवार , भास्कर लक्ष्मण भोळे , मामासाहेब घुमरे , मनोहर म्हैसाळकर , रज्जन त्रिवेदी , रुपाताई कुळकर्णी , सीमाताई साखरे या ज्येष्ठांशिवाय माझ्या वयोगटाचे आणि विचाराचे अनेकजण समकालीन विषयांवर गप्पा मारण्यासाठी उपलब्ध असत . ऐंशीच्या दशकाच्या अगदी सुरुवातीला मोहन कडू , विश्वेश्वर सावदेकर आणि मी असं त्रिकुट होतं . त्यात पुढे श्रीपाद भालचंद्र जोशी , भाऊ पंचभाई , वसंत वाहोकर , गिरीश गांधी अशा अनेकांची भर पडली . प्रकाश देशपांडे , सिद्धार्थ सोनटक्के , धनंजय गोडबोले सोबत आमचा मंतरलेल्या सोनेरी पाण्याचा एक 'सॅटरडे क्लब' अनेक वर्ष होता ; नागपूरला आले की विजय सातोकर , कविवर्य नारायण कुळकर्णी-कवठेकर यांचा त्यात सहभाग असे . नागपूरच्या शेवटच्या कांही वर्षात विवेक रानडे , सुनीती देव , अविनाश रोडे , शुभदा फडणवीस , हेमंत काळीकर असा आमचा एक ब्रेकफास्ट ग्रुप तयार झालेला होता आणि त्यात अनेकदा भोळे सरही उत्साहनं येत . नागपूरच्या विविध भागात खवय्येगिरी करत रविवारी सकाळी आमच्यात मैफिली रंगत . कांही वेळा या गप्पा म्हणजे निर्भेळ चकाट्या असतं आणि त्यात अनेकदा गांभीर्यही असे . विविध विषयावरचे अपडेट मिळत , नवनवीन प्रवाह या गप्पात आकलनाच्या कक्षेत येत . आधी एक पत्रकार आणि एक संपादक महणून म्हणून मला या गप्पातून मिळणारा फिडबॅक मोलाचा असे . मुंबई , दिल्लीतही या कार्यक्रमांत खंड पडला नाही . अन्न , वस्त्र , निवारा या गरजा भागल्या की माणसाची सांस्कृतिक भूक जागृत होते याचा तो प्रत्यय असायचा .

दिल्ली सोडून औरंगाबादला येताना प्रत्येक दिवस रविवार होता . कामाचा जो कांही भाग होता तो 'मन की खुशी दिल का राज' होता . त्या प्रमाणे कामाची सुरुवात करणारच होतो कारण लेखनासाठी अनेक विषय मनात रेंगाळत होते . तरी रविवारी सकाळी करायचं काय हा प्रश्न असणार होताच मात्र , तो सोडवला 'संडे क्लब'नं .
कधी गंभीर चर्चा तर कधी चकाट्या पिटणं , कधी एखाद्या तज्ज्ञाचं प्रतिपादन किंवा नामवंतानं केलेली मांडणी ऐकणं तर कधी उपस्थितांनी एकमेकाची चक्क खेचणं ; यासाठी सुरु झालेल्या 'संडे क्लब' या औरंगाबादच्या अनौपचारिक आणि आनंददायी गप्पांच्या अड्ड्याला आता दहा वर्ष पूर्ण आली आहेत . प्राचीन दोस्तयार आणि पत्रकार निशिकांत भालेराव तसंच 'स्वामी' श्याम देशपांडे हे दोघे या अड्ड्याचे मूळ निवासी तसंच संडे क्लब या नावाचं पितृत्व निशिकांतच असल्याचं सांगितलं जातं . या जागेला मठ आणि त्याचे प्रमुख श्यामराव ; म्हणून मी त्याला स्वामी म्हणायला सुरुवात केली आणि श्यामराव आता गावाचे स्वामी झाले आहेत ! श्याम(राव) देशपांडे म्हणजे तेच ते- 'राजहंस'वाले .

राजहंस प्रकाशनाच्या औरंगाबाद कार्यालयात दर रविवारी बहरणाऱ्या या अड्ड्याविषयी दिल्लीत असतांना पासून ऐकून होतो . औरंगाबादला स्थायिक झाल्यावरच्या पहिल्या रविवार पासून या क्लबचा सदस्य आहे . या क्लबचा मी 'मूळ निवासी सदस्य' नाही , त्याची 'भोचक' जाणीव करुन देणारेही इथे आहेत पण , ते असो , ती जाणीव करुन देण्याचा लहेजा मात्र खुमासदार आहे , यात शंकाच नाही !
तर , ज्यांची ज्ञानलालसा पाहून अचंबित व्हायला होतं ते मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती आणि ज्येष्ठ विचारवंत नरेंद्र चपळगावकर ( त्यांना सगळेच नानासाहेब म्हणून ओळखतात ) ज्येष्ठतम प्रख्यात समीक्षक डॉ. सुधीर रसाळ , नामवंत कथाकार रा. रं. बोराडे आणि माझा आवडता लेखक बब्रुवान रुद्रकंठावार उपाख्य धनंजय चिंचोलीकर यांच्यासह अनेक पत्रकार , संपादक , लेखक , कवी , प्राध्यापक या संडे क्लबचे नियमित आणि अनियमितही सदस्य आहेत . या अड्ड्याला घटना नाही , नियम नाहीत आणि विषयाची कोणतीही चौकट नाही . स्पर्शातून स्पर्श उलगडत जावा तसा एका विषयातून दुसरा विषय निघत जातो . वाचन , पुस्तकं , संगीत , इतिहास , मराठी-इंग्रजी-उर्दू-हिन्दी भाषातील साहित्य , समाजकारण , प्रशासन , कायदा असा या गप्पांचं पट व्यापक असतो . राजकारणही इथं मुळीच वर्ज्य नाही ; आपापली राजकीय मतं इथे मोकळेपणानं मांडता येतात मात्र , त्यात एकारला कर्कश्शपणा आला तर खिल्लीही उडवली जाते . तरी , या गटाचे-त्या तटाचे , पुरोगामी-प्रतिगामी , डावे-उजवे असे कोणतीही भेद इथे नाहीत . म्हणूनच सर्व वृत्तपत्रांचे संपादक ( एकमेकाच्या उखाळया -पाखाळ्या न काढता आणि एकमेकाकडे वाकड्या तोंडानं न पाहता ) इथं एकत्र येऊ शकतात .

औरंगाबाद बाहेरुन आलेल्या पाहुण्याशिवाय कुणालाही निमंत्रण देण्याची प्रथा नाही . इथे वाढदिवस साजरे होतात , सदस्यांच्या पुस्तकांची प्रकाशनं होतात पण , त्यासाठी होणारा पुष्पगुच्छ , अल्पोपहार , चहा-कॉफी याचा खर्च कोण करतं , याचा कांहीही हिशेब नसतो . कुणाचा सत्कार किंवा पुस्तक प्रकाशनाचा एखादा अपवाद वगळता बातमीही प्रसारित केली जात नाही . एका 'पै'चंही सदस्यत्व नसणार्‍या या क्लबमध्ये जे कांही घडतं ते सहज , नैसर्गिकपणे . यायचं असेल तर रुसव्या-फुगव्याचे अंगरखे बाहेर काढून या आणि अड्ड्यावर रमा असा मामला असतो . थोडक्यात संडे क्लब हे निखळ गप्पा मारण्यासाठी बहरलेलं एक झाड आहे ; त्या झाडावर हेलकावे घेत रमून जाता येतं . इथं दोन-अडीच तास गप्पा झाल्या की आपण एकदम 'चार्ज' झालेलो असतो .

संडे क्लबमध्ये होणाऱ्या गप्पांचा बाज कसा निखळ असतो तर , एकदा नानासाहेब आल्यावर मी म्हटलं, 'नानाचं वय फेसबुकवर १८ दाखवलेलं आहे', लगेच सुधीर रसाळ सर मिश्किलपणे म्हणाले, 'म्हणजे आता नानासाठी वधू संशोधन सुरु करायला हवं !' नानासाहेब चपळगावकर आणि सुधीर रसाळ यांची मैत्री चक्क पन्नासवर आणखी कांही वर्ष वयाची म्हणजे , चांगली मुरलेली आहे . वयाच्या ऐंशीच्या उंबरठ्यावर असणारे हे ज्ञानी एकमेकाला 'अरे-तुरे' करतात . एकुणातच रसाळ आणि चपळगावकर या दोन ज्ञानी जनांच्या गप्पा ऐकणं ही एक बौध्दिक मेजवानी असते . त्यात भूत काळातले अनेक सांस्कृतिक , राजकीय , सामाजिक संदर्भ येतात आणि आपल्या आकलनाला अनेक नवे कोंब फुटतात .

एखादा अनुभव कथन करतांना सुधीर रसाळ सर सहज सांगतात ' ही हकिकत नाही तर आख्यायिका आहे बरं का !' आणि किस्सा , हकीकत , अनुभव , आख्यायिका यातील भेद अनेक छटांसह अलगद उलगडला जातो . अंधारलेलं घर प्रकाशाच्या वेलींनी उजाळवं तसं हे उद्बोधन असतं . सध्या सर्वच माध्यमात भाषेची जी लक्तरं काढली जाताहेत -अमुक तमुकचा मृत्यू झाला त्याचा किंवा त्याच्या विवाहाचा किस्सा ( मरण किंवा कुणाचा विवाह हा किस्सा कसा असेल ? ते तर वास्तव नाही का ? ) अशी भाषा माध्यमात आजकाल ऐकायला , वाचायला मिळते . त्या पार्श्वभूमीवर ही प्रतिपादनं ऐकायला विशेषत: प्रकाश वृत्त वाहिन्यातील आपण बोलतो तेच मराठी असल्याचा अहंकार झालेल्या सर्व संपादक आणि पत्रकारांनी इथे यायला हवं असं मग वाटून जातं .
एकदा अशा आनंदायी गप्पा सुरु असतांना रा. रं. बोराडे यांना कुणी तरी विचारलं , 'ऐकू येतंय ना नीट ?' तर बोराडे सर सहज स्वरात उत्तरले- 'तुम्ही बोलण्याचा आनंद घ्या . मला नुसतेच आवाज ऐकू येतात आजकाल . चालू द्या तुमचं !'

एका मालक संपादकाचा उल्लेख त्यांच्या स्तुतीपाठकांनी 'विद्यापीठ' असा केला . त्यावर संडे-क्लबमधे घनघोर चर्चा झाली आणि त्यातून पत्र महर्षि अनंतराव भालेराव यांच्या स्मरण ग्रंथाच्या निर्मितीचा प्रकल्प इथेच आकाराला आला . 'कैवल्यज्ञानी हे त्या ग्रंथाचं नावं आहे . संपादक मंडळातून अन्य सर्व नावं गळाली आणि संपादक म्हणून मी एकटाच उरलो . निशिकांत भालेराव , स्वामी श्यामराव देशपांडे आणि श्रीकांत उमरीकर यांचं सहकार्य घेत हा प्रकल्प आता पूर्ण झालाय . अनेक नामवंतांचं लेखन सहकार्य त्यासाठी लाभलं आहे . पण , ते पुस्तक प्रकाशित होणार नेमकं कधी , हे नांदेडच्या अभंग प्रकाशनाचा संजीव कुळकर्णीच सांगू शकतो . 'पुस्तक नेमकं प्रकाशित होणार ?' असं प्रकाशकाला दरडावून विचारण्याचं धाडस कुणी साहित्यिक/संपादक दाखवू शकतो का ? असो . संडे क्लबची ही नोंद नसून असे अनौपचारिक अड्डे ही सर्वच शहरांची आणि सांस्कृतिक जाण असणार्‍या सर्वांची गरज आहे . माझी ही गरज औरंगाबादच्या संडे क्लबनं खूपशी भागवली .

बेगम मंगला रुग्णशय्येवर खिळल्यापासून या क्लबच्या बैठकातली माझी हजेरी बंद झाली . आता बेगम या जगात नाही आणि कोरोनामुळे संडे क्लबही नाही . माणसं घरात कैद झाली आहेत . रविवार आहे . श्रावण सुरु आहे , पाऊसभरले ढग गर्द दाटून आलेले आहेत . अधूनमधून एखादी सर मंदपणे बरसत आहे . या अजूगपणात तर संडे क्लबची नितांत गरज भासतेय .

कोरोना संपेलच एक नं एक दिवस तेव्हा औरंगाबादला आलात की या आमच्या संडे क्लबमधे .

( © या मजकुराचे सर्वाधिकार सुरक्षित आहेत )

www.praveenbardapurkar.com / praveen.bardapurkar@ gmail.com

( २६ जुलै २०२० )

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Praveen Bardapurkars Blog marathi
Top