आळंदी: ज्या वयात हातात पुस्तकं असायला हवीत आणि स्वप्नांना गवसणी घालायची असते, त्याच 17 व्या वर्षी एका अल्पवयीन मुलगी आई झाली आहे. हा धक्कादायक प्रकार चहोली खुर्द परिसरात उघडकीस आला आहे.
आई-वडिलांनीच मुलीचा जबरदस्तीने बालविवाह लावून दिला आणि त्यानंतर सासरी झालेल्या अमानुष अत्याचारांमुळे मुलगी अल्पवयीन असतानाच माता झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा सर्व प्रकार मे 2024 ते नोव्हेंबर 2025 या दरम्यान घडला. पीडित मुलगी केवळ 17 वर्षांची असताना, तिचे लग्न लावून देणं कायदेशीर गुन्हा आहे हे माहित असूनही, तिच्या आई-वडिलांनी आणि मामाने तिला लग्नाच्या बेडीत अडकवलं. लग्नानंतर सासरी तिची कोणत्याही प्रकारे काळजी घेण्याऐवजी पतीने तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केला. या अत्याचारांमुळे ही मुलगी गरोदर राहिली आणि तिने एका चिमुरडीला जन्म दिला.
या प्रकरणात आळंदी पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत पीडित मुलीचा पती, सासू-सासरे, तिचे आई-वडील आणि मामा अशा एकूण 7 जणांविरुद्ध पोक्सो (POCSO) आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

