Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
20 कोटींचा सिनेमा अन् पडद्यामागची कथा! 'कॉकरोच जनता पार्टी' आंदोलनावर बनणार चित्रपट

20 कोटींचा सिनेमा अन् पडद्यामागची कथा! 'कॉकरोच जनता पार्टी' आंदोलनावर बनणार चित्रपट

वी दिल्ली: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'च्या (CJP) आंदोलनाची आता मोठ्या पडद्यावर चर्चा होणार आहे.

या आंदोलनावर आधारित एका सिनेमाची निर्मिती सुरू करण्यात आली असून, या चित्रपटाचे नाव ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ असे ठेवण्यात आले आहे.

नीट परीक्षेतील कथित पेपरफुटीच्या मुद्द्यावरून कॉकरोच जनता पार्टीने दिल्लीमध्ये मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळाला होता. अनेक तरुण या आंदोलनात सहभागी होण्यासाठी जंतर-मंतरवर पोहोचले होते. या अनोख्या आंदोलनामुळे राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठी चर्चा निर्माण झाली होती.

या संपूर्ण घटनाक्रमावर आधारित चित्रपट तयार करण्याची जबाबदारी जयपूरचे रहिवासी गोविंद देव ब्रह्म यांनी घेतली आहे. त्यांनी सखोल अभ्यास आणि संशोधन केल्यानंतर या सिनेमाची अधिकृत घोषणा केली आहे. या चित्रपटातून आंदोलनाची तयारी, त्यामागील नियोजन आणि यापूर्वी समोर न आलेल्या काही घटनांचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ हे शीर्षकही सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या नावातून त्या काळातील राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट छोट्या बजेटचा प्रकल्प नसून मोठ्या स्तरावर तयार केला जाणार आहे. या सिनेमाचे बजेट 20 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर अंतिम काम सुरू असून, शूटिंगसाठी लोकेशन निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे.

या चित्रपटात कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची भूमिका कोण साकारणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. सर्व नियोजन योग्य प्रकारे झाले तर हा चित्रपट 2027 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News