Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
743 हेक्टर शेती वाचली! पाबळ-खैरेनगर-धामारी एमआयडीसीच्या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

743 हेक्टर शेती वाचली! पाबळ-खैरेनगर-धामारी एमआयडीसीच्या प्रक्रियेला मुख्यमंत्र्यांचा ब्रेक

पोपट पाचंगे

पाबळ: पाबळ - खैरेनगर - धामारी 'एमआयडीसी' ला तात्काळ स्थगिती, ७४३ हेक्टर शेती क्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा
रांजणगाव गणपती/प्रतिनिधी - शिरुर तालुक्यातील पाबळ, खैरैनगर व धामारी येथील नियोजित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रकल्पाच्या संपादित करण्याच्या प्रशासकीय कारवाईसह सर्व प्रक्रियेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ स्थगिती दिली.

यामुळे या तिन्ही गावातील सुमारे ७४३ हेक्टर शेतजमिन क्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या महत्वपूर्ण विषयाबाबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना बोर्डीकर – साकोरे यांनी पाबळ, धामारी व खैरैनगर येथील बाधित शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्री फडणवीस यांची मंत्रालय, मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रस्तावित संपूर्ण भूसंपादन प्रक्रियेला आणि ७/१२ वरील नोंदींना तात्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
पाबळ, खैरैनगर व धामारी या गावातील एकूण ७४३.५७५५ हेक्टर क्षेत्रावर एमआयडीसी अधिनियम १९६१ च्या नियमांनुसार ‘अधिसूचित क्षेत्र’ असा शेरा ७/१२ च्या इतर अधिकारात नोंदवण्याचे निर्देश तहसीलदार शिरूर यांना जून २०२६ मध्ये देण्यात आले होते.

या गावातील बागायती शेत जमिनीवर एमआयडीसीचे शेरे टाकण्यास सुरुवात झाल्याने या तिन्ही गावातील शेतकरी व व ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.या निर्णयाविरोधात स्थानिक शेतकऱ्यांनी माजी गृहमंत्री वळसे पाटील यांची भेट घेऊन या विषयासंदर्भात लक्ष घालण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार वळसे पाटील व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री बोर्डीकर – साकोरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून बैठक घेण्याची मागणी केली होती, त्यानुसार मंगळवारी, दि.१ मंत्रालय, मुंबई येथे झालेल्या बैठकीत वळसे पाटील व बोर्डीकर यांनी शेतकऱ्यांची बाजू प्रभावीपणे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निदर्शनास आणून दिली.

जनभावना आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांचे होणारे अतोनात नुकसान विचारात घेऊन वळसे पाटील व बोर्डीकर यांच्या मागणीवर मुख्यमंत्र्यांनी पाबळ, खैरैनगर व धामारी येथील ७/१२ उताऱ्यावर तसेच फेरफार पत्रावर कोणत्याही प्रकारचा ‘अधिसूचित क्षेत्र’ किंवा भूसंपादनाचा शेरा मारण्याच्या कारवाईला तात्काळ स्थगिती दिल्याने या भागातील शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.

पाबळ,धामारी व खैरेनगर या तिन्ही गावातील बागायती शेतजमिनी एमआयडीसीकरिता संपादित करु नये, म्हणून स्थानिक शेतकऱ्यांनी मोठा संघर्ष केला. आम्ही ही बाब माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर मांडली. वळसे पाटील व मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्थानिक शेतकऱ्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत एमआयडीसी प्रकल्पाच्या सर्व प्रक्रियेला तूर्तास स्थगिती दिल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याचे शेतकरी ज्ञानेश्वर खैरे यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News