Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी थेट एका वर्षाची मुदतवाढ जाहीर; नेमकं कोणत्या अति-शर्ती लागू? वाचा सविस्तर.

अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मोठा दिलासा! मराठी शिकण्यासाठी थेट एका वर्षाची मुदतवाढ जाहीर; नेमकं कोणत्या अति-शर्ती लागू? वाचा सविस्तर.

मुंबई: मुंबईतील ऑटो आणि टॅक्सी चालकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परप्रांतीय आणि अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एका वर्षाची मुदत देण्यात आली आहे.

या कालावधीत केवळ मराठी भाषा येत नाही, या कारणावरून चालकांवर कोणतीही दंडात्मक किंवा कायदेशीर कारवाई केली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील हजारो अमराठी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईतील ऑटो-टॅक्सी चालक संघटनेच्या प्रतिनिधींनी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी चालकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. दैनंदिन व्यवहारासाठी आवश्यक असलेली जुजबी मराठी भाषा शिकण्यासाठी चालकांना आणखी किमान एक वर्षाचा वेळ देण्यात यावा, अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

हाजी अराफत यांच्या नेतृत्वाखालील ऑटो आणि रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. चालकांनी जुजबी मराठी येणे आवश्यक असल्याचे मान्य केले असून, मराठी शिकण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न सुरू असल्याचेही सांगितले. पुढील काळात क्लासेसच्या माध्यमातून तसेच मराठी साहित्याचा अभ्यास करून चालकांना आवश्यक तेवढी भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे संघटनेच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

चालकांच्या मागणीचा विचार करून फडणवीस यांनी त्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. चालकांना मराठी शिकण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक असल्याने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी स्वतःहून पुढे येत मराठी शिकण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे त्यांना आवश्यक वेळ देण्यात आला आहे. या एका वर्षात संघटनेच्या माध्यमातून चालकांना दैनंदिन व्यवहारात वापरता येईल, इतकी मराठी भाषा शिकवली जाणार आहे.

दरम्यान, या निर्णयाचे ऑटो-टॅक्सी चालक संघटनेकडून स्वागत करण्यात आले आहे. चालकांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून मुदतवाढ दिल्याबद्दल संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. त्यामुळे मराठी भाषेच्या मुद्द्यावरून कारवाईची चिंता असलेल्या अमराठी चालकांना आता पुढील एक वर्ष भाषा शिकण्यासाठी मिळणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News