पुणे: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी एका कार्यक्रमासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसकडून संभाव्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी खबरदारी म्हणून काही काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यापूर्वीच पोलिसांनी रात्रीपासून कारवाईला सुरुवात केली. युवक काँग्रेस आणि काँग्रेसच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये राहुल शिरसाट यांच्यासह काही कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
येरवडा परिसरातून काही काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच अक्षय जैन, गौरव बाळंदे, सद्दाम शेख आणि राजू ठोंबरे या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही खबरदारी घेतल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
यापूर्वी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दौऱ्यावेळी राहुल शिरसाट यांनी काळे झेंडे दाखवत आंदोलन केले होते. त्यामुळे यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी आधीच पावले उचलल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीकडूनही पुण्यात आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. दुसरीकडे भाजपचे काही कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयाबाहेर जमा झाल्याने दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ती चौधरी आणि माजी आमदार मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. उत्सव हॉटेल चौक परिसरात सकाळपासून काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली.
अमित शाह लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यासाठी पुण्यात आले आहेत. कार्यक्रमस्थळी कटारिया महाविद्यालयात सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर प्रत्येकाची तपासणी केली जात असून डॉग स्क्वॉडकडूनही परिसराची पाहणी करण्यात आली आहे. शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

