Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भीमाशंकरकडे जाणारा रस्ता ठप्प! दरड कोसळल्याने वाहतूक रोखली; पावसाचा जोर कायम असल्याने धोका कायम

भीमाशंकरकडे जाणारा रस्ता ठप्प! दरड कोसळल्याने वाहतूक रोखली; पावसाचा जोर कायम असल्याने धोका कायम

पुणे: गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्यात दरड कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. अशातच टोकावडे-कारकुडी ते भीमाशंकर मार्गावर मोठी दरड कोसळल्याने भीमाशंकरकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे.

या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने वाहतूक थांबवून नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सतत पडणाऱ्या पावसामुळे डोंगराचा मोठा भाग खचून अवाढव्य दगड आणि मोठ्या प्रमाणात माती रस्त्यावर आली. त्यामुळे संपूर्ण मार्ग बंद झाला असून कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू ठेवणे धोकादायक ठरत आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार, परिसरात अद्यापही पाऊस सुरू असल्याने आणखी दरडी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बचावात्मक उपाययोजना करण्यात येत असून, संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

रस्ता मोकळा करण्यासाठी यंत्रसामग्रीच्या मदतीने काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, सततचा पाऊस आणि डोंगरावरील सैल झालेली माती यामुळे हे काम आव्हानात्मक ठरत आहे. सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतरच मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, भीमाशंकरकडे जाणाऱ्या भाविक, पर्यटक आणि इतर प्रवाशांनी सध्या या मार्गाने प्रवास करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक प्रवास असल्यास पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही सांगण्यात आले आहे.

मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने डोंगराळ भागात जाणाऱ्या नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने पुन्हा एकदा केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News