विशाल शिंदे Bhor Snake News नसरापूर, ता. 30 : शिंदेवाडी (ता. भोर) येथे घडलेली घटना केवळ दुर्मिळ नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेवर थेट प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरत आहे. डोंगर माथ्यावर लागलेल्या वनव्यामुळे नैसर्गिक अधिवास उद्ध्वस्त झाल्याने फुरसे सापाला खाली स्थलांतर करावे लागले आणि त्याच अवस्थेत त्याने तब्बल ९ पिल्लांना जन्म दिला.
निसर्गावर होत असलेल्या मानवनिर्मित अत्याचाराचे हे जिवंत चित्र समोर आले आहे. Bhor Snake News
मिळालेल्या माहितीनुसार, डोंगर भागात वाढते वनवे, बेकायदा मुरूम उत्खनन आणि अनियंत्रित विकासकामांमुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अधिवास नष्ट झाल्याने सापांसह अनेक प्राणी गावांकडे स्थलांतर करत आहेत. शिंदेवाडीतील घटनेतही डोंगरावरील आगीपासून बचाव करण्यासाठी खाली आलेल्या फुरसे सापाने प्रसूती केली, हा गंभीर इशारा मानला जात आहे. Bhor Snake News
सर्पतज्ञ शंकर वाडकर यांनी या सापाला सुरक्षितपणे पकडून स्थलांतरित करताना तो प्रसूती अवस्थेत असल्याचे लक्षात आणले. त्यानंतर त्या सापाने ९ पिल्लांना जन्म दिला. फुरसे सापाची पिल्ले प्रत्यक्ष पाहणे अत्यंत दुर्मिळ मानले जाते, त्यामुळे ही घटना विशेष ठरली असली तरी तिच्यामागील कारणे अत्यंत चिंताजनक आहेत. Bhor Snake News
परिसरात मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट्स, फार्महाऊस उभारणी आणि मुरूमाचे अवैध उत्खनन सुरू असल्याने पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. "वनवे आणि उत्खननावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. कडक कारवाई न झाल्यास वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात येईल," असा इशारा पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे अध्यक्ष सुशील विभुते यांनी प्रशासनाला दिला आहे. Bhor Snake News
दरम्यान, साप आणि त्याची सर्व पिल्ले सुरक्षितपणे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली आहेत. मात्र, ही घटना प्रशासनासाठी 'अलार्म बेल' ठरत असून, पर्यावरण संवर्धनासाठी तातडीने ठोस उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. अन्यथा निसर्गाचा समतोल ढासळून भविष्यात याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त होत आहे. Bhor Snake News

