Pune Crime : इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावरील गागरगाव हद्दीत एका हॉटेलमध्ये अवैध देहव्यवसाय सुरू असल्याचा प्रकार पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला आहे. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी छापा टाकून हॉटेल मालकासह एका महिलेला अटक केली आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित हॉटेलमध्ये बिअर बारच्या नावाखाली अवैध देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी गुप्त पथकाच्या मदतीने सापळा रचत कारवाई केली. छाप्यामध्ये हॉटेलमध्ये सुरू असलेला गैरप्रकार उघड झाला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून काही रोख रक्कम तसेच इतर साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी हॉटेल मालक आणि एका महिलेला ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून अशा प्रकारांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. सार्वजनिक ठिकाणी अशा बेकायदेशीर कृत्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर परिणाम होत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
इंदापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याची चौकशी सुरू आहे. पुढील कारवाईत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

