पुणे: बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Baramati Election) आता रंगत वाढली असून काँग्रेसने उमेदवार जाहीर करत निवडणूक लढवण्याचा निर्णय स्पष्ट केला आहे. काँग्रेसकडून आकाश मोरे (Akash More) यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव असून, माजी आमदार विजयराव मोरे यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे बारामतीत थेट लढत होणार हे निश्चित झाले आहे. (Baramati News)
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. या पार्श्वभूमीवर पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. महायुतीकडून तसे प्रयत्नही सुरू होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षांना आवाहन करत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका मांडली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडूनही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड व्हावी, अशी भूमिका असल्याची चर्चा होती. मात्र काँग्रेसने स्वतंत्र भूमिका घेत निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यामागे राज्यातील बदलती राजकीय समीकरणे आणि आपली ताकद दाखवण्याची रणनीती असल्याचे मानले जाते.
दरम्यान, या निवडणुकीत केवळ काँग्रेसच नव्हे तर इतर उमेदवारही मैदानात उतरले आहेत. लक्ष्मण हाके आणि अभिजित बिचुकले यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केल्याने स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.
बारामती हा पारंपरिकदृष्ट्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे या निवडणुकीत सहानुभूतीची लाट, स्थानिक समीकरणे आणि पक्षीय ताकद यांचा मोठा प्रभाव पडणार आहे. काँग्रेसच्या एन्ट्रीमुळे ही निवडणूक केवळ औपचारिक न राहता प्रत्यक्ष राजकीय लढतीत परिवर्तित झाली आहे.
आता पुढील काही दिवसांत प्रचाराचा जोर वाढणार असून, मतदार कोणाला पसंती देतात यावर बारामतीतील पुढील राजकीय दिशा ठरणार आहे.

