Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू.

चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू.

बारामती: भंडाऱ्याच्या कार्यक्रमासाठी नातेवाईक आणि नागरिक एकत्र आले असताना बारामती शहरात काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली. फलटण रस्त्यावरील जाधव वस्ती परिसरात टेम्पो रिव्हर्स घेत असताना अवघ्या 1 वर्ष 5 महिन्यांच्या चिमुकलीचा अपघातात मृत्यू झाला.

सान्वी विशाल कुंभार असे मृत मुलीचे नाव आहे.

ही घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. जाधव वस्ती येथे भंडाऱ्याच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. त्यासाठी स्वयंपाकाचे साहित्य घेऊन मारुती कॅरी टेम्पो तेथे आला होता. साहित्य खाली उतरवल्यानंतर चालकाने वाहन मागे घेण्यास सुरुवात केली.

यावेळी सान्वी परिसरात खेळत होती. टेम्पो मागे घेताना चालकाला ती दिसली नाही. त्यामुळे वाहनाची तिला जोरदार धडक बसली. गंभीर दुखापत झाल्याने चिमुकलीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. काही क्षणांपूर्वी आनंदाचे वातावरण असलेल्या ठिकाणी अचानक शोककळा पसरली. लहान मुलीच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाईक आणि उपस्थित नागरिकांनी कुटुंबीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, या प्रकरणी सान्वीचे काका विजय माणिक कुंभार यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी टेम्पो चालक नमोकार संतोष रासकर (वय 20, रा. बारामती) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News