Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
चारित्र्यावर संशय, अन् थेट जीवे मारण्याचा प्रयत्न! महिला पोलीस अधिकाऱ्यावर पतीने केला प्राणघातक हल्ला.

चारित्र्यावर संशय, अन् थेट जीवे मारण्याचा प्रयत्न! महिला पोलीस अधिकाऱ्यावर पतीने केला प्राणघातक हल्ला.

पुणे: पुण्यातील खडकी बाजार पोलीस वसाहतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका पतीवर आपल्याच पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, योगेश माधव बेरी (वय 38, रा. तळेगाव दाभाडे) असे या अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तक्रारदार महिला अधिकारी या पुणे पोलीस दलाच्या विशेष शाखेत (स्पेशल ब्रँच) सहायक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत आहेत. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. गेल्या काही काळापासून आरोपी पती पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. याच कारणामुळे दोघांमध्ये वाद वाढले होते आणि त्रास असह्य झाल्यामुळे महिला अधिकाऱ्याने शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.

घटस्फोटाचा अर्ज केल्यापासून आरोपी पती प्रचंड रागात होता. २७ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महिला अधिकारी कर्तव्यावरून घरी परतल्या असता, आरोपी पती आधीच घरात लपून बसला होता. त्याने थेट त्यांच्या डोळ्यात राख फेकली आणि ओढणीने गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

महिला अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यामुळे महिलेचा जीव वाचला. दरम्यान, स्थानिकांनी मध्यस्थी करून आरोपीला पकडून ठेवले आणि मोठा अनर्थ टाळला.

या गंभीर घटनेनंतर महिला पोलीस अधिकाऱ्याने खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सध्या पोलीस उपनिरीक्षक रेणुका गालफाडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी तातडीने कारवाई करत पतीला खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News