दौंड : दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात २८ जुलै रोजी मध्यरात्री १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पिस्तूल, तलवारी आणि कोयत्यांसारखी घातक शस्त्रे घेऊन आलेल्या टोळीने एका घरात जबरदस्तीने प्रवेश करून कुटुंबीयांना धमकावल्याचा, तरुणीचे कथित अपहरण केल्याचा तसेच सोन्याची चैन आणि रोख रक्कम लुटल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात आठ जणांसह दोन-तीन अनोळखी आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नदीम अन्वर शेख, इरफान उर्फ वसीम अन्वर शेख, फैजल मैफुज काझी, अशपाक समीर शेख, अफताब समीर शेख, शफीक मुलाणी, आरबाज अन्वर शेख, बादशाह अदम शेख तसेच दोन ते तीन अनोळखी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सारिका आण्णासाहेब उगले (वय ४७, रा. कुंभार गल्ली, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्याद उगले या मुलगा पियुष आणि मुलगी गौरी यांच्यासह घरी झोपल्या असताना घराची बेल वाजली. दार उघडताच पिस्तूल, कोयते आणि तलवारीसारखी शस्त्रे हातात घेतलेले आरोपी समोर उभे असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. काही आरोपींनी घरात घुसून फिर्यादीला धक्काबुक्की केली. त्यानंतर पिस्तूल डोक्याला लावून कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. यावेळी फिर्यादीच्या गळ्यातील सुमारे दीड तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावून घेतली तसेच कपाटातील ५० हजार रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतल्याचा आरोप आहे.
याचवेळी घरातील गौरी उगले हिला जबरदस्तीने उचलून आरोपींनी त्यांच्या कारमध्ये बसवून नेल्याचा गंभीर आरोप फिर्यादीने केला आहे. मुलीच्या जीविताच्या भीतीमुळे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा नोंदविण्याऐवजी बेपत्ता असल्याची नोंद केली होती. मात्र, नंतर धीर मिळाल्यानंतर त्यांनी सविस्तर तक्रार दाखल केली, असे फिर्यादीने म्हटले आहे. आरोपींकडून जातिवाचक शिवीगाळ, धमक्या आणि काही आक्षेपार्ह घोषणा केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, या प्रकरणी नदीम अन्वर शेख, इरफान उर्फ वसीम अन्वर शेख, फैजल मैफुज काझी, अशपाक समीर शेख, अफताब समीर शेख, शफीक मुलाणी, आरबाज अन्वर शेख, बादशाह अदम शेख तसेच दोन ते तीन अनोळखी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील घरात घुसखोरी, अपहरण, दरोडा, धमकी, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच आर्म्स अॅक्टच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस करीत आहेत. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणातील सर्व आरोपांची तपासादरम्यान पडताळणी केली जाणार आहे.

