Beed Accident : बीड: बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली असून प्रशासनात हळहळ व्यक्त केली जात आहे. लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील नेहरूनगर कॉर्नरजवळ झालेल्या अपघातात केज तालुक्यात कार्यरत तहसीलदार राकेश गिड्डे यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेमुळे महसूल विभागात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळच्या सुमारास राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. रेणापूर फाट्याजवळ त्यांची कार अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन उलटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेतली.
अपघातानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.
राकेश गिड्डे हे तरुण आणि कार्यक्षम अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक निधनामुळे केज तालुक्यात तसेच प्रशासनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सहकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
दरम्यान, बीड जिल्ह्यात सलग दोन दिवसांत दोन गंभीर अपघात घडल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा समोर आला आहे. अंबाजोगाई येथील रिंग रोडवर झालेल्या दुसऱ्या अपघातात एका बँक अधिकाऱ्याचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून रस्ते सुरक्षा उपाययोजना कडक करण्याची मागणी होत आहे.
या घटनांमुळे वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि नियमांचे पालन करावे, असे आवाहनही करण्यात येत आहे.

