Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
धनुष्यबाण अखेर कोणाचा? शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू; न्यायालयाचा महत्वाचा आदेश

धनुष्यबाण अखेर कोणाचा? शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाची अंतिम सुनावणी सुरू; न्यायालयाचा महत्वाचा आदेश

मुंबई: शिवसेना पक्षाचे नाव आणि 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाच्या अधिकारावरून सुरू असलेल्या महत्त्वाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाने फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेल्या निर्णयाला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आव्हान दिले असून, या प्रकरणावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होत आहे.

न्यायालयाने दोन्ही बाजूंना मांडण्यात आलेले सर्व मुद्दे संकलित करून सादर करण्याचे निर्देश दिले असून पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.

जून 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत 40 आमदार आणि काही अपक्ष सदस्य गेले. त्यानंतर शिवसेनेतील वाद निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला. निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

उद्धव ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी न्यायालयात बाजू मांडली. गेल्या काही वर्षांपासून या प्रकरणाचा अंतिम निकाल प्रलंबित असल्याने लोकप्रतिनिधींचे पक्षांतर सुरूच राहिले असून, ही परिस्थिती लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. तसेच पक्ष आणि संसदीय पक्ष या दोन वेगळ्या संकल्पना असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयात स्पष्ट करण्यात आले असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

सुनावणीदरम्यान पक्षाच्या घटनेचा आणि निवडणूक आयोगाच्या निर्णयाचा सखोल विचार होणे आवश्यक असल्याचा युक्तिवादही करण्यात आला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने सर्व मुद्दे लेखी स्वरूपात सादर करण्याचे निर्देश दिले असून, आता 4 ऑगस्ट रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News