सोनीपत: हरयाणातील सोनीपत जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली असून, दोन सख्ख्या भावांनी एका कारखान्यात विषारी निकोटिन प्राशन करून आपले आयुष्य संपवले आहे. अभिषेक (26) आणि ऋतिक (24) अशी या तरुणांची नावे असून, त्यांच्या जाण्याने संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
एकाच चितेवर दोन्ही भावांना अग्नी देण्यात आला, हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.
दोन्ही भाऊ नाथूपूर येथील ‘न्यूट्रीकेअर’ नावाच्या माऊथ फ्रेशनर बनवणाऱ्या कारखान्यात काम करायचे. सोमवारी कामावर असतानाच त्यांनी कारखान्यात प्रक्रियेसाठी वापरले जाणारे घातक निकोटिन प्राशन केले. प्रकृती खालावल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीतील रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
तपासात असे समोर आले आहे की, हे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून गंभीर समस्यांशी झुंजत होते. मुलांच्या आईला कर्करोग (Cancer) असून वडिलांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांच्या उपचारांचा मोठा आर्थिक भार या तरुणांच्या खांद्यावर होता. मोठ्या भावाचे वैवाहिक आयुष्य विस्कळीत होते आणि पत्नी सोडून गेली होती. कुटुंबातील कर्त्या पुरुषांच्या आजारपणामुळे घराची संपूर्ण जबाबदारी या दोन तरुणांवर होती. या मानसिक आणि आर्थिक तणावातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसते.

