Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
E20 पेट्रोलचा गाड्यांवर परिणाम! मायलेज 6% पर्यंत घटू शकते; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

E20 पेट्रोलचा गाड्यांवर परिणाम! मायलेज 6% पर्यंत घटू शकते; नितीन गडकरींचा मोठा खुलासा

मुंबई : देशात E20 पेट्रोलच्या वापरावर गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. अनेक वाहनधारकांनी E20 पेट्रोलमुळे गाडीचे मायलेज कमी होत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. याबाबत केंद्र सरकारकडून सातत्याने स्पष्टीकरण दिले जात आहे.

केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी संसदेत E20 पेट्रोलबाबत महत्त्वाची माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार, पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रण असलेल्या E20 इंधनामुळे वाहनांची फ्यूल इकॉनॉमी म्हणजेच मायलेज 2 ते 6 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. मात्र, याचा परिणाम वाहनाची कॅटेगरी आणि गाडी किती जुनी आहे यावर अवलंबून राहणार आहे.

लोकसभेतील लिखित उत्तरात गडकरी यांनी सांगितले की, E20 पेट्रोलच्या वापरामुळे वाहनांच्या इंजिनमध्ये मोठी समस्या निर्माण झाल्याचे ऑन-रोड टेस्टमध्ये आढळून आलेले नाही. उलट काही बाबतीत वाहनांची कामगिरी सुधारण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सरकारच्या माहितीनुसार, E20 इंधनामुळे E10 पेट्रोलच्या तुलनेत कार्बन उत्सर्जनात जवळपास 30 टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते. तसेच वाहनांचा एक्सीलरेशन आणि राइड क्वालिटी चांगली होण्यास मदत होऊ शकते.

E20 पेट्रोलच्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI), सोसायटी ऑफ ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (SIAM) आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी संयुक्तपणे अभ्यास केला आहे. या अभ्यासात BS-3, BS-4 आणि BS-6 श्रेणीतील वाहनांवर E20 इंधनाचा परिणाम तपासण्यात आला.

यापूर्वी सरकारने स्पष्ट केले होते की, जुन्या BS-3 वाहनांमधील काही रबर पार्ट्स आणि गॅस्केट्समध्ये बदल करण्याची गरज लागू शकते. त्यामुळे जुन्या वाहनधारकांच्या मनात अजूनही अनेक प्रश्न आहेत.

E20 पेट्रोल लागू झाल्यापासून ग्राहक आणि विरोधकांकडून यावर टीका होत आहे. विशेषतः जुन्या वाहनांच्या इंजिनवर होणाऱ्या परिणामाबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, सरकारचे म्हणणे आहे की, योग्य चाचण्या आणि अभ्यासानंतरच हे इंधन टप्प्याटप्प्याने लागू करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News