पुणे : पिंपरी-चिंचवड येथील चिखली येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचे काम सुरू असून, या प्रकल्पासाठी आवश्यक असलेली उच्चदाब वीज जोडणी करण्यात येणार आहे. या कामासाठी गुरुवारी काही काळ वीजपुरवठा बंद ठेवावा लागणार आहे.
त्याचा थेट परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे.
महानगरपालिकेच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत संबंधित काम केले जाणार आहे. कामाच्या ठिकाणी कामगारांची सुरक्षितता लक्षात घेऊन उच्चदाब वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या कालावधीत अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा खंडित राहणार आहे.
बोऱ्हाडेवाडी, इंद्रायणीनगर, सेक्टर 4, 6, 9, 11 आणि 12, शीवरस्ता, चक्रपाणी वसाहत, धावडेवस्ती, मोशी, चऱ्होली, डुडुळगाव आणि चोवीसावाडी या भागांना पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. या परिसरांसोबतच लगतच्या भागांतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
नागरिकांनी गुरुवारी पाण्याची गरज लक्षात घेऊन आधीच साठा करून ठेवावा आणि दिवसभरातील पाण्याचा वापर नियोजनपूर्वक करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.
वीज जोडणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शुक्रवारी पाणीपुरवठा सुरळीत होण्यास काही वेळ लागू शकतो. त्यामुळे शुक्रवारी सकाळी काही भागांत कमी दाबाने पाणी येण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी पुरवठा अनियमित राहू शकतो. त्यामुळे नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन पाण्याचे नियोजन करावे.

