Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कारभारात हलगर्जी महागात; उपमुख्यमंत्री शिंदेंनी सहाय्यक आयुक्ताला दाखवला बाहेरचा रस्ता,नेमकं काय घडलं?

कारभारात हलगर्जी महागात; उपमुख्यमंत्री शिंदेंनी सहाय्यक आयुक्ताला दाखवला बाहेरचा रस्ता,नेमकं काय घडलं?

मुंबई : मागील काही दिवसांपासून ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. या पूरपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला भेट दिली.

यावेळी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत त्यांनी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख तथा सहाय्यक आयुक्त यासीन तडवी यांना 8 दिवसांसाठी तातडीने निलंबित करण्याचे आदेश दिले.

आपत्कालीन परिस्थितीत शहरात विविध ठिकाणी दुर्घटना घडत असताना, आपत्ती व्यवस्थापन प्रमुखांनी घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती हाताळणे गरजेचे होते. मात्र, अनेक महत्त्वाच्या ठिकाणी यासीन तडवी अनुपस्थित असल्याचे समोर आले. इतकेच नव्हे तर उपमुख्यमंत्र्यांच्या अचानक झालेल्या दौऱ्यादरम्यानही ते हजर नव्हते. अधिकाऱ्याचा हा निष्काळजीपणा पाहून एकनाथ शिंदे यांनी तीव्र संताप व्यक्त केला आणि जागेवरच त्यांच्या निलंबनाची कारवाई केली.

कक्षाची पाहणी केल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, संकटकाळात जनतेला वाऱ्यावर सोडणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही. कामचुकारपणा करणाऱ्यांवर यापुढे थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने पूर्ण क्षमतेने काम करून नागरिकांना दिलासा देणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

यावेळी शहरातील परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांनी खालील महत्त्वाचे निर्णय व निर्देश दिले:आपत्तीच्या काळात कामाचा वाढता ताण पाहता, ठाणे पालिकेत आऊटसोर्सिंगच्या माध्यमातून तातडीने नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल.

झाडे हटवणे व पाण्याचा निचरा: सखल भागात साचलेले पाणी त्वरित उपसणे आणि उन्मळून पडलेली झाडे रस्त्यावरून तातडीने बाजूला करण्याचे आदेश त्यांनी पालिका प्रशासनाला दिले.

वृक्ष प्राधिकरण सक्षमीकरण: ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाला अधिक सक्षम करण्यासाठी लवकरच कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News