Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
खवड्या डोंगर प्रकरण! केसची फाईल बंद होणार? कुटुंबियांचे परस्परविरोधी खळबळजनक दावे; प्रकरणात नवा ट्विस्ट

खवड्या डोंगर प्रकरण! केसची फाईल बंद होणार? कुटुंबियांचे परस्परविरोधी खळबळजनक दावे; प्रकरणात नवा ट्विस्ट

त्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावर चांदगुडे कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर या प्रकरणाभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे. मुरलीधर, संगीता आणि त्यांचा मुलगा कुणाल यांच्या मृत्यूनंतर कुटुंबातील मतभेद, वाद आणि मृत्यूच्या कारणाबाबत वेगवेगळे दावे समोर येत आहेत.

पोलिस तपासात अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नसल्याने हे प्रकरण कोणत्याही निश्चित निष्कर्षाशिवाय बंद होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, कुटुंबीयांनी मांडलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

एमआयडीसी वाळूज पोलिसांनी मुरलीधर आणि संगीता यांच्या आई-वडिलांसह दोन्ही कुटुंबांतील प्रत्येकी तीन बहिणींचे सविस्तर जबाब नोंदवले आहेत. चांदगुडे कुटुंबात काही काळापासून कौटुंबिक वाद आणि मतभेद असल्याची माहिती तपासात समोर आली होती. मात्र, कुटुंबीयांच्या जबाबानंतर दोन्ही बाजूंनी कोणावरही संशय किंवा आरोप करत तक्रार दाखल करण्यास नकार दिला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण त्या तिघांनाच माहीत होते, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे यांनी सांगितले.

या सगळ्या पार्श्वभूमीवर संगीता यांच्या लहान बहिणी कल्याणी यांनी मात्र वेगळीच शक्यता व्यक्त केली आहे. हा आत्महत्येचा प्रकार नसून अपघात असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, आई-वडिलांमधील मतभेद दूर करून दोघांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी कुणाल खवड्या डोंगरावर गेला होता. त्याने वडिलांना भावनिक पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी कुणालला समजावण्यासाठी गेलेल्या मुरलीधर यांचा अचानक तोल गेला. तोल सावरण्याच्या प्रयत्नात पुढील दुर्घटना घडल्याचे कल्याणी यांनी सांगितले.

कुणालने यापूर्वीही डोंगरावर जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, अशी चर्चा होती. मात्र, कल्याणी यांनी हा दावा फेटाळून लावला. गेल्या वर्षी कुणाल केवळ शांतता आणि एकांत मिळावा म्हणून घराबाहेर पडला होता, असे त्यांनी सांगितले. त्याने आईला मेसेज करून आपण बाहेर जात असल्याची माहितीही दिली होती. मात्र, संगीता यांनी तो मेसेज वेळेवर न पाहिल्याने त्या घाबरल्या आणि त्यांनी चिकलठाणा पोलिस ठाणे गाठले. रात्री सुमारे ११ वाजता कुणाल सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तो गैरसमज असल्याचे समोर आले होते.

त्यामुळे चांदगुडे कुटुंबाच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप प्रश्न कायम असून, कुटुंबीयांच्या वेगवेगळ्या दाव्यांमुळे या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News