दौंड, ता. 1: जुन्या वादातून एका तरुणाला आठ जणांनी घेरून शिवीगाळ, दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना दौंड-सिद्धटेक रोडवर खोरवडी (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीत रविवारी (ता.
30 ) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. यावेळी एका व्यक्तीने चामड्याच्या बेल्टने तरुणाला मारहाण केल्याने त्याच्या तोंडातून रक्त येऊन तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
याप्रकरणी नागेश मोहन भंडलकर (वय 23, व्यवसाय शेती, रा. उमाजीनाईक चौक, बोरीबेल, ता. दौंड) यांनी दौंड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार राजेंद्र अर्जुन खोमणे, नारायण सर्जेराव खोमणे, गणेश नारायण खोमणे, किरण सर्जेराव खोमणे, सुरेश अर्जुन खोमणे, ओमकार चव्हाण, अविनाश खोमणे आणि ओमकार कसबे (सर्व रा. खोरवडी, ता. दौंड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडलकर यांचा मानलेला भाचा यश महादेव जाधव हा त्याच्या आई-वडिलांसोबत बोरीबेल येथे राहतो. भंडलकर व यश यांचे चांगले संबंध असून, यश वैयक्तिक कामानिमित्त त्यांना फोन करत असतो. रविवारी (ता. 30) सायंकाळी सहाच्या सुमारास भंडलकर हे आलेगाव येथे शेतीचे काम करत होते. त्यावेळी यशने आपल्या मोबाईलवरून भंडलकर यांना फोन करून "मामा, मला काही लोकांनी खोरवडी येथे अडवले आहे, तू लवकर ये," असे सांगितले.
फोन आल्यानंतर भंडलकर यांनी तातडीने खोरवडी गाठले. दौंड-सिद्धटेक रोडवर पोहोचल्यावर त्यांना यशला काही जण घेरून मारहाण करत असल्याचे दिसले. त्यावेळी भंडलकर यांनी यशला सोडविण्याचा प्रयत्न केला. यशला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात येत होती. याचवेळी सुरेश अर्जुन खोमणे याने पँटवर वापरण्यात येणाऱ्या चामड्याच्या बेल्टने यशला मारहाण केली. मारहाणीमध्ये यशच्या तोंडातून रक्त येऊ लागल्याने भंडलकर यांनी त्याला आरोपींच्या ताब्यातून सोडवले.
त्यानंतर जखमी यशला तातडीने पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. आरोपींनी यशला मारहाण करण्यासोबतच शिवीगाळ व दमदाटी करून त्याला जखमी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 117(2), 115(2), 126(2), 189(2), 190, 191(2), 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, घटनेमागील नेमके कारण काय, याबाबत पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. मारहाणीचे कारण, आरोपींची भूमिका आणि यापूर्वीचा काही वाद होता का, याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. या घटनेमुळे खोरवडी परिसरात चर्चेला उधाण आले आहे.

