Marriage Fraud : सातारा : राज्यात विवाह फसवणुकीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, एका महिलेने अनेक पुरुषांशी लग्न करून काही दिवसांतच पैसे आणि दागिने घेऊन फरार झाल्याचा आरोप आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भानुप्रिया भाऊराव बनसोड असे आरोपी महिलेचे नाव असून ती यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, तिने अल्पावधीत किमान 5 ते 6 पुरुषांशी विवाह केले. प्रत्येक वेळी ती विश्वास संपादन करण्यासाठी काही दिवस पतीच्या घरी राहत असे. त्यानंतर योग्य संधी साधून घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन ती पहाटेच्या वेळी पसार होत असल्याचे समोर आले आहे.
पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने दिलेले पत्ते आणि ओळख तपशील खोटे असल्यामुळे तिचा शोध घेणे कठीण झाले आहे. काही प्रकरणांमध्ये ती एजंटांच्या माध्यमातून विवाह जुळवत असल्याचेही समजते. लग्नासाठी उत्सुक असलेल्या पुरुषांना लक्ष्य करून त्यांची मानसिक फसवणूक केली जात असल्याचा आरोप आहे.
या प्रकरणामुळे विशेषतः ग्रामीण भागात चिंता वाढली आहे. यवतमाळ, बीड, लातूर आणि जालना या भागांमध्येही अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकारामागे काही संघटित टोळ्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एका पीडिताने सांगितले की, लग्नानंतर आरोपी महिला सुमारे 8 दिवस घरी राहिली आणि त्यानंतर पैसे व दागिने घेऊन फरार झाली. नंतर तपासात तिने यापूर्वीही अनेक वेळा लग्न केल्याचे समोर आले.
या पार्श्वभूमीवर पोलिसांनी नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. लग्नापूर्वी समोरील व्यक्तीची संपूर्ण माहिती आणि पार्श्वभूमी तपासून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही वाढत आहे.

