Dailyhunt
LinkedIn वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचाच! तुमचा डेटा सेफ नाही; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

LinkedIn वापरणाऱ्यांनो ही बातमी वाचाच! तुमचा डेटा सेफ नाही; रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई: प्रोफेशनल नेटवर्किंग आणि नोकरी शोधण्यासाठी आज 'लिंक्डइन' (LinkedIn) हे जगातील सर्वात विश्वासार्ह व्यासपीठ मानले जाते. मात्र, याच प्लॅटफॉर्मबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एका ताज्या संशोधनानुसार, लिंक्डइन आपल्या युझर्सच्या ब्राउझर अ‍ॅक्टिव्हिटीवर नजर ठेवत असून, त्यांच्या डिव्हाईसची तांत्रिक माहिती गोळा करत असल्याचे उघड झाले आहे.

रिपोर्टनुसार, लिंक्डइन प्रत्येक वेळी पेज लोड करताना एक विशिष्ट ‘जावास्क्रिप्ट’ तुमच्या ब्राउझरमध्ये पाठवते. ही स्क्रिप्ट तुमच्या गुगल क्रोममधील एक्स्टेंशन्सना स्कॅन करू शकते. सोप्या भाषेत सांगायचे तर, तुम्ही तुमच्या ब्राउझरमध्ये कोणती टूल्स वापरता, याची इत्थंभूत माहिती लिंक्डइनला मिळते.

केवळ एक्स्टेंशन्सच नाही, तर ही स्क्रिप्ट तुमच्या डिव्हाईसचा अक्षरशः ‘कुंडली’ काढते. यात खालील माहितीचा समावेश आहे.

  • तुमचा टाइम झोन आणि भाषा सेटिंग.

  • डिव्हाईसची बॅटरी स्टेटस आणि मेमरी (RAM).

  • स्क्रीन साईज आणि स्टोअरेज क्षमता.

  • तुमच्या सिस्टममधील CPU कोअर्सची संख्या.

ही सर्व माहिती ‘HUMAN Security’ नावाच्या सायबर सिक्युरिटी कंपनीकडे पाठवली जात असल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

एखादा प्लॅटफॉर्म तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या ब्राउझरमधील इतर अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करत असेल, तर ती तुमच्या डिजिटल प्रायव्हसीची मोठी पायमल्ली आहे. तुमची माहिती जाहिरातींसाठी किंवा इतर कारणांसाठी वापरली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुरक्षित राहण्यासाठी तुमच्या ब्राउझरमधील अनावश्यक एक्स्टेंशन्स काढून टाका. तसेच, वेळोवेळी ब्राउझरची प्रायव्हसी सेटिंग्स तपासून पहा. तंत्रज्ञान सोयीचे असले तरी, आपली वैयक्तिक माहिती किती शेअर करायची, याचे भान ठेवणे आज गरजेचे झाले आहे.

दरम्यान, आरोपांवर स्पष्टीकरण देताना लिंक्डइनने म्हटले आहे की, “आम्ही युझर्सची प्रायव्हसी जपण्यासाठी आणि प्लॅटफॉर्मवरील डेटा चोरी रोखण्यासाठी असे करतो. आम्ही कोणतीही संवेदनशील माहिती चोरत नाही.” कंपनीच्या मते, हा केवळ सुरक्षेचा एक भाग आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News