पुणे: पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात आता महत्त्वाचे वळण आले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी तपासादरम्यान स्पष्ट माहिती देत नसल्याचा संशय पोलिसांना आहे.
त्यामुळे दोघांची ‘लाय डिटेक्टर टेस्ट’ अर्थात पॉलिग्राफ चाचणी करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलीस न्यायालयाची परवानगी मागण्याची शक्यता आहे.
पॉलिग्राफ टेस्ट ही गुन्हे तपासात वापरली जाणारी विशेष चाचणी आहे. या चाचणीदरम्यान आरोपीच्या रक्तदाब, नाडीचा वेग, श्वासोच्छ्वास आणि इतर शारीरिक प्रतिक्रियांची नोंद केली जाते. चौकशीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना शरीरातील होणाऱ्या बदलांच्या आधारे संबंधित व्यक्ती सत्य सांगत आहे की माहिती लपवत आहे, याचा अंदाज तपास यंत्रणा घेण्याचा प्रयत्न करते.
भारतात पॉलिग्राफ टेस्टचा अहवाल न्यायालयात थेट पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही. मात्र, तपासाची दिशा निश्चित करण्यासाठी आणि नवीन धागेदोरे मिळवण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची मानली जाते.
दरम्यान, सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी 3 जुलै रोजी संपत असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. यावेळी पुणे ग्रामीण पोलीस त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी करण्यासोबतच पॉलिग्राफ टेस्टसाठीही न्यायालयाची परवानगी मागू शकतात.
या प्रकरणात पोलिसांनी आरोपींचे मोबाईल, कपडे आणि गुन्ह्यात वापरल्याचा संशय असलेली वाहने जप्त केली आहेत. तसेच सिया गोयलच्या घराचीही झाडाझडती घेण्यात आली असून सर्व जप्त साहित्याची फॉरेन्सिक आणि तांत्रिक तपासणी सुरू आहे. या तपासातून आणखी महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

