Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लोहगड प्रकरणानंतर बदलला लग्नाचा ट्रेंड! मुलगा-मुलीचा भूतकाळ, कर्ज, व्यसन अन् प्रेमप्रकरण शोधण्यासाठी डिटेक्टिव्हची घेतली जातेय मदत

लोहगड प्रकरणानंतर बदलला लग्नाचा ट्रेंड! मुलगा-मुलीचा भूतकाळ, कर्ज, व्यसन अन् प्रेमप्रकरण शोधण्यासाठी डिटेक्टिव्हची घेतली जातेय मदत

पुणे : लग्न ठरवताना केवळ पत्रिका जुळवण्याऐवजी आता भावी जोडीदाराची संपूर्ण माहिती तपासण्याकडे अनेक पालकांचा कल वाढताना दिसत आहे. लोहगड किल्ल्यावर सिया गोयलने तिच्या होणाऱ्या पती केतन अग्रवालची केलेली हत्या आणि देशातील इतर काही घटनांनंतर अरेंज मॅरेज करणाऱ्या कुटुंबांमध्ये अधिक सावधगिरीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेषतः उच्चवर्गीय कुटुंबांकडून लग्नापूर्वी खासगी गुप्तहेरांची मदत घेतली जात असल्याचे समोर आले आहे. भावी जोडीदाराचा स्वभाव, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी, आर्थिक स्थिती, शिक्षण, नोकरी, कर्ज, व्यसन तसेच त्याच्या सामाजिक वर्तुळाबाबत माहिती मिळवण्यासाठी पालकांकडून चौकशी केली जात आहे.

अनेक पालक आता केवळ कुंडली किंवा बाह्य माहितीवर विश्वास न ठेवता स्वतंत्र पडताळणी करण्याला प्राधान्य देत आहेत. काही प्रकरणांमध्ये भावी जोडीदाराच्या जुन्या संबंधांबाबत, वागणुकीबाबत आणि जीवनशैलीबाबतही माहिती घेतली जात असल्याचे खासगी तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.

एका खाजगी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, लग्न ठरवण्यापूर्वी अनेक कुटुंबांकडून आता भावी जोडीदाराची शैक्षणिक पात्रता, उत्पन्न, कुटुंबाची पार्श्वभूमी, आर्थिक जबाबदाऱ्या आणि व्यक्तिमत्त्व याची माहिती तपासली जात आहे. काही पालक लाखो रुपये खर्च करून गुप्तहेरांकडून सविस्तर अहवाल घेत असल्याचेही समोर आले आहे.

गुप्तहेरांच्या तपासात संशयास्पद बाबी आढळल्यास काही कुटुंबे पुढील निर्णय घेण्यापूर्वीच लग्नाचे स्थळ नाकारत आहेत. बदलत्या काळात लग्न जुळवताना विश्वासासोबतच पडताळणीला देखील महत्त्व दिले जात असल्याचे या प्रकारातून दिसून येत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News