Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लोणी काळभोर येथे अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा धडाका! गांजा विक्री करणारी महिला जेरबंद तर तिघांवर एनडीपीएस अंतर्गत गुन्हे

लोणी काळभोर येथे अंमली पदार्थांविरोधात पोलिसांचा धडाका! गांजा विक्री करणारी महिला जेरबंद तर तिघांवर एनडीपीएस अंतर्गत गुन्हे

लोणी काळभोर : लोणी काळभोर परिसरात अमली पदार्थांच्या वाढत्या गैरव्यवहारावर पोलिसांनी मोठा आघात केला आहे. अवघ्या चार दिवसांत लोणी काळभोर पोलीस आणि पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सलग चार स्वतंत्र कारवाया करत गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेसह सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन करणाऱ्या तिघांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

या धडक कारवाईमुळे अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारात गुंतलेल्या घटकांचे धाबे दणाणले आहेत.

सुनिता संतोष भाले (वय ३४),आदित्य रामदास मेमाणे (वय १९) सागर भगवान ऊफाडे (वय ३१) व अगस्ती बबन भारती (वय ४५) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांच्या या सलग कारवायांमुळे लोणी काळभोर परिसरातील अंमली पदार्थांचे सेवन आणि विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. नागरिकांकडूनही या कारवायांचे स्वागत होत असून, अशाच प्रकारे सातत्याने धडक मोहीम राबवून अमली पदार्थांचे जाळे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची मागणी होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील इंदिरानगर परिसरात सर्वात मोठी कारवाई २९ जुलै रोजी करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून सुनिता संतोष भाले (वय ३४) हिला ताब्यात घेतले. तिच्या ताब्यातून विक्रीसाठी ठेवलेला ६७८ ग्रॅम गांजा, अंदाजे ४० हजार ६८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, ३० जुलै रोजी पुणे गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने लोणी काळभोर येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाजवळ कारवाई करत आदित्य रामदास मेमाणे (वय १९) याला गांजायुक्त सिगारेट (रिजला पेपर) ओढताना रंगेहात पकडले. त्याच्याकडील गांजा ओढण्याचे साहित्य जप्त करून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

यापूर्वी २८ जुलै रोजी लोणी स्टेशन परिसरातील आशीर्वाद हॉटेलजवळ सागर भगवान ऊफाडे (वय ३१) हा चिलीममध्ये गांजा भरून सेवन करताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच दिवशी लोणी गावातील बाजारतळ परिसरात अगस्ती बबन भारती (वय ४५) यालाही गांजा ओढताना पकडण्यात आले. दोघांविरुद्धही एनडीपीएस कायद्यान्वये स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून गांजा सेवनासाठी वापरलेली चिलीम व साहित्य पंचांसमक्ष नष्ट करण्यात आले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News