लोणी काळभोर, ता. 2 : लोणी काळभोर (ता. हवली) ग्रामपंचायत हद्दीतील केसकर वस्तीपरिसरात राहणारी 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी मध्यरात्री घरातून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या 22 वर्षीय तरुणाने अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही फूस लावून तिला पळवून नेल्याचा आरोप मुलीच्या भावाने केला आहे.
त्यानुसार एकावर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंकज आप्पा राठोड (वय 22) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचे कुटुंब हे मूळचे बीड जिल्ह्यातील असून, ऊसतोडणीच्या कामासाठी 5 ऑगस्टपासून लोणी काळभोर येथील केसकर यांच्या शेतात वास्तव्यास होते. 28 ऑगस्ट रोजी रात्री साडेअकरा ते मध्यरात्रीच्या सुमारास कुटुंबीय घरात झोपले असताना, मुलीच्या वाहिनीला जाग आली. त्यावेळी त्यांची अल्पवयीन मुलगी घरात दिसून आली नाही. कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला; मात्र तिचा ठावठिकाणा लागला नाही.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वानऊच्या सुमारास अल्पवयीन मुलीने भावाच्या मोबाईलवर फोन करून "मी पंकज बरोबर असून त्याच्या घरच्यांना त्रास देऊ नका," असे सांगितले आहे. त्यानंतर कुटुंबीयांनी शेजारी राहणाऱ्या आकाश राठोड यांच्याकडे पंकजबाबत चौकशी केली. मात्र, त्यांना याबाबत काही माहिती नसल्याचे सांगण्यात आले.
त्यानंतर अल्पवयीन मुलीला शेजारी राहणारा पंकज आप्पा राठोड याने फूस लावून पळवून नेल्याचा संशय कुटुंबीयांना आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या भावाने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पंकज राठोड याच्याविरोधात कायदेशीर तक्रार दिली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

