Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा..

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा..

शिरूर : शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अखंडित व पूर्ण दाबाने मोफत वीजपुरवठा करावा, वीजचोरीचा आर्थिक भार शेतकऱ्यांवर टाकू नये,मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची संपूर्ण माहिती जाहीर करावी तसेच स्वतंत्र कृषी फिडरची तातडीने उभारणी करावी.अन्यथा तालुक्यातील गायरान जमिनीवरील सौर कृषी प्रकल्पांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा क्रांतिवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय शिवाजी पाचंगे यांनी महावितरणच्या केडगाव विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.

निवेदनात करण्यात आलेल्या दाव्यानुसार,शिरूर तालुक्यात उद्योगांना २४ तास वीजपुरवठा होत असताना शेतकऱ्यांना केवळ ५ ते ८ तास तोही कमी दाबाने वीजपुरवठा केला जात आहे.त्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून,महावितरणच्या धोरणाबाबत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत तालुक्यातील गायरान जमिनी खाजगी कंपन्यांना देण्यात आल्या असल्या तरी त्या संदर्भातील करार, कायदेशीर प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी फिडर उभारणीची माहिती जाहीर करण्यात आलेली नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. तसेच सौर योजनेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांना कितपत झाला,याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात स्थानिक पातळीवरील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. व्यावसायिक वापरासाठी होणाऱ्या कथित वीजचोरीकडे दुर्लक्ष करून त्याचा भार शेती वीजपुरवठ्यावर टाकला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.यासोबतच कृषी ट्रान्सफॉर्मर जळाल्यानंतर ते बदलण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध कारणांनी पैसे उकळले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे.या सर्व प्रकरणांची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून चौकशी करावी व दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

महावितरणने एका महिन्याच्या आत वीजपुरवठा,स्वतंत्र कृषी फिडर,सौर योजनेतील पारदर्शकता आणि शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांवर ठोस कार्यवाही केली नाही,तर तालुक्यातील गायरान जमिनीवरील मुख्यमंत्री सौर कृषी योजनेची कामे बंद पाडण्यासाठी आंदोलन करण्यात येईल.तसेच या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासनाची राहील,असा इशाराही क्रांतिवीर प्रतिष्ठानने दिला आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्य अभियंता, महावितरण (पुणे),जिल्हाधिकारी पुणे,उपकार्यकारी अभियंता(शिरूर व शिक्रापूर)तसेच शिरूर,शिक्रापूर आणि रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांना देण्यात आल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News