Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

पुणे : ठाणे येथील वागळे इस्टेट परिसरातील किसन नगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. एका साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालकाला त्याच्याच जन्मदात्या आईने अमानुषपणे मारहाण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या क्रूर घटनेमुळे संपूर्ण परिसरात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, दोषी महिलेवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

किसन नगर येथील शाळा क्रमांक 3 मध्ये शिकणारा हा चिमुकला काल दुपारी त्याच्या आजीसोबत स्थानिक शिवसेना मध्यवर्ती शाखेत गेला होता. तिथे उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांचे लक्ष अचानक त्या मुलाच्या शरीरावरील जखमांकडे गेले. जेव्हा त्यांनी मुलाकडे प्रेमाने विचारपूस केली, तेव्हा त्याने धक्कादायक खुलासा केला. आईने आपल्याला बेदम मारहाण केली असून, गरम उलथण्याने हात आणि पायांवर चटके दिल्यांचे त्या लहानग्याने सांगितले.

या साडेतीन वर्षाच्या मुलाची विदारक अवस्था पाहून शिवसेना शाखाप्रमुख सुनील मोरे यांनी तातडीने पावले उचलली. त्यांनी चिमुकल्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी मुलाची तपासणी करून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत. यानंतर मोरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांसह थेट त्या महिलेचे घर गाठले आणि तिला वागळे इस्टेट पोलिसांच्या स्वाधीन केले.

या जखमी मुलावर रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून, पुढील कायदेशीर तपास वेगाने सुरू आहे.पुराव्यांच्या आधारे पोलीस या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करत असून, बालकावरील या अत्याचाराने स्थानिक रहिवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News