Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
म्हाडाच्या घरांसाठी अर्जच नाहीत; ताथवडेतील शेकडो घरे रिक्त

म्हाडाच्या घरांसाठी अर्जच नाहीत; ताथवडेतील शेकडो घरे रिक्त

मुंबई: ताथवडे येथील म्हाडाच्या घरांच्या विक्रीसाठी घेण्यात आलेल्या सोडतीला यंदा अपेक्षेइतका प्रतिसाद मिळालेला नाही. पुणे मंडळाने 634 घरांसाठी ही प्रक्रिया राबवली होती. मात्र, उपलब्ध माहितीनुसार केवळ 275 घरांसाठी अर्जदार मिळाले असून तब्बल 359 घरांना अद्याप ग्राहक मिळालेला नाही.

आता उर्वरित घरांची विक्री करण्यासाठी म्हाडा पुन्हा सोडत जाहीर करणार की 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या पद्धतीचा अवलंब करणार, याबाबत पुढील निर्णयाकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हस्ते मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने या घरांची सोडत काढण्यात आली. नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी पुणे मंडळाने यावेळी उत्पन्न गटाची अटही शिथिल केली होती. असे असतानाही अर्जांची संख्या अपेक्षेप्रमाणे वाढली नाही.

ताथवडे परिसरात म्हाडाच्या जागेवर घरांचा प्रकल्प दोन टप्प्यांत विकसित केला जात आहे. पहिल्या टप्प्यातील 600 पेक्षा अधिक सदनिकांचे बांधकाम पूर्ण करून त्यांचे वाटप करण्यात आले आहे. तर दुसऱ्या टप्प्यात 792 घरांची निर्मिती सुरू असून, त्याचे काम आता शेवटच्या टप्प्यात पोहोचले आहे.

दुसऱ्या टप्प्यातील घरांसाठी यापूर्वीही सोडत घेण्यात आली होती. मात्र, घरांच्या किमती तसेच इतर कारणांमुळे इच्छुकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे उर्वरित घरांच्या विक्रीसाठी 19 जुलै रोजी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर 20 जुलैपासून नोंदणी आणि अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

या वेळी 634 घरांसाठी एकूण 484 अर्ज दाखल झाले. सोडत झाल्यानंतर 359 घरांसाठी एकही अर्जदार नसल्याचे स्पष्ट झाले. परिणामी मोठ्या संख्येने घरे रिक्त राहिली आहेत.

विशेष म्हणजे पत्रकारांसाठी राखीव 19, स्वातंत्र्यसैनिकांसाठी 18, लोकप्रतिनिधींसाठी 15, म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी 15 आणि कलाकारांसाठी राखीव 14 घरांनाही अर्ज मिळालेले नाहीत. सामाजिक आरक्षणाच्या कोट्यातील काही घरेही अद्याप उपलब्ध आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News