Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
"मी ट्रेनने घरी येतेय, पुणे स्टेशनवर घ्यायला या." 75 वर्षीय आजीचा शेवटचा फोन; त्यानंतर अचानक बेपत्ता

"मी ट्रेनने घरी येतेय, पुणे स्टेशनवर घ्यायला या." 75 वर्षीय आजीचा शेवटचा फोन; त्यानंतर अचानक बेपत्ता

रुळी कांचन, (पुणे) : मुंबई येथील वज्रेश्वरी आणि महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेलेल्या 75 वर्षीय वृद्ध महिला पुण्यावरून उरुळी कांचन येथे घरी परतत असताना अचानक बेपत्ता (मिसिंग) झाल्याची घटना समोर आली आहे.

“मी पुणे रेल्वे स्टेशनवर असून उरुळी कांचनला येणाऱ्या ट्रेनने घरी येत आहे, मला घ्यायला स्थानकावर या,” असा फोन त्यांनी नातसुनेला केला होता; मात्र त्यानंतर त्या घरी पोहोचल्याच नाहीत आणि त्यांचा मोबाईलही बंद लागत आहे.

मंडाबाई बापू गडदे (वय-75, रा. धायगुडेवस्ती, खामगाव टेक, ता. हवेली) असे बेपत्ता महिलेचे नाव आहे. याप्रकरणी तात्याराम बापू गडदे (वय 50, व्यवसाय- शेती, रा. धायगुडेवस्ती, खामगाव टेक, ता. हवेली, जि. पुणे) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली असून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खामगाव टेक येथील मंडाबाई बापू गडदे या 28 जुलै 2026 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन रेल्वे स्टेशनवरून मुंबई येथे वज्रेश्वरी आणि महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघाल्या होत्या. दर्शन घेऊन त्या 30 जुलै रोजी सकाळी पाऊणे आठ वाजण्याच्या सुमारास पुण्यापर्यंत परत आल्या.

त्यांनी पुणे रेल्वे स्टेशनवरून आपली नातसून प्रणाली गडदे यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. “मी सध्या पुणे रेल्वे स्टेशनला आहे, उरुळी कांचनला येणाऱ्या रेल्वेने घरी येते, मला घेण्यासाठी स्टेशनला या,” असे सांगून त्यांनी फोन ठेवला. फोन आल्यानंतर कुटुंबीयांनी उरुळी कांचन रेल्वे स्थानकावर त्यांची वाट पाहिली, मात्र बऱ्याच वेळानंतरही मंडाबाई घरी आल्या नाहीत. कुटुंबीयांनी त्यांच्या मोबाईल नंबरवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन सतत बंद लागत होता.

दरम्यान, नातेवाईकांकडे विचारपूस करून आणि आजूबाजूच्या परिसरात तसेच रेल्वे स्थानक परिसरात शोध घेऊनही त्यांचा काहीच सुगावा न लागल्याने, अखेर शुक्रवारी (ता. 31) कुटुंबीयांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News