Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोशी कचरा डेपोत भीषण दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळल्याने १५ ते २० कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

मोशी कचरा डेपोत भीषण दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळल्याने १५ ते २० कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवडमधील मोशी परिसरात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली. कचरा डेपोशेजारी असलेल्या 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पावर कचऱ्याचा मोठा ढिगारा कोसळल्याने इमारतीचा काही भाग जमीनदोस्त झाला.

या दुर्घटनेत १४ ते १५ कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. ढिगारा हटवून अडकलेल्या कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी यंत्रणांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. त्यावेळी प्रकल्पातील काही कामगार आपली शिफ्ट संपवून चेंजिंग रूममध्ये कपडे बदलण्यासाठी गेले होते. त्याच वेळी शेजारील कचऱ्याचा मोठा ढिगारा इमारतीवर कोसळल्याने इमारतीचा काही भाग पडला.

बचाव पथकाने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर अडकलेल्या एका कर्मचाऱ्याला सुखरूप बाहेर काढले आहे. तसेच आणखी एका जखमी कामगाराला ढिगाऱ्यातून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अजूनही सुमारे १५ जण अडकले असण्याची शक्यता आहे. कचऱ्याचा ढिगारा मोठा असल्याने अडकलेल्या कामगारांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे त्यांच्यापर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

घटनास्थळी जेसीबी, अग्निशमन दलाची यंत्रणा आणि एनडीआरएफचे जवान बचावकार्य करत आहेत. जखमींना उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात येत असून, प्रशासनाकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, त्याचा तपास सुरू आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News