Dailyhunt
'नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव' लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

'नोकरी टिकवून ठेवायची असेल तर माझ्यासोबत संबंध ठेव' लिपिकाची महिला कर्मचाऱ्याला शरीरसुखाची मागणी; लिपिकाच्या निलंबनाचे आदेश

मुंबई: कल्याण-डोंबिवली महापालिकेत कार्यरत असलेल्या एका अधिकाऱ्यावर (Mumbai Crime) महिला कर्मचाऱ्याकडून शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप समोर आल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी लिपिक भूषण पाटील याच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिकेने त्याला तात्काळ निलंबित केले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात एका कामाच्या कारणावरून संबंधित महिला कर्मचारी आणि आरोपी यांच्यात वाद झाला होता. त्या वेळी आरोपीने तिच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. यानंतर 20 फेब्रुवारी रोजी रात्री आरोपीने महिलेच्या मोबाईलवर फोन करून "तुला नोकरीवरून काढण्याचे आदेश आले आहेत, ते थांबवायचे असतील तर मला काय देशील?" असे विचारत शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, पीडित महिलेने यापूर्वीही या अधिकाऱ्याविरोधात महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. अखेर तिने पोलिसांकडे धाव घेत मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. या तक्रारीनंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी काही महिला कर्मचाऱ्यांनीही त्याच अधिकाऱ्याविरोधात तक्रारी केल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ एकट्या घटनेपुरता मर्यादित नसून, कार्यालयीन वातावरणात महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी तातडीने कारवाई करत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित केले. तपासावर परिणाम होऊ नये, पुरावे नष्ट होऊ नयेत आणि साक्षीदारांवर दबाव येऊ नये, यासाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News