Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ओबीसींचा 'महा एल्गार मोर्चा' मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

ओबीसींचा 'महा एल्गार मोर्चा' मुंबईच्या दिशेने; पोलिसांची परवानगी नाही, तरी लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम

पुणे : महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापले आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असतानाच ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी प्रा. लक्ष्मण हाके यांनी मुंबईच्या दिशेने 'महा एल्गार मोर्चा' काढण्याची घोषणा केली आहे.

पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली असली, तरी आंदोलन मागे घेण्यास हाके तयार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दौंड तालुक्यातील पाटस येथे राज्यभरातील ओबीसी कार्यकर्ते आणि समर्थक एकत्र येत आहेत. पाटस टोलनाक्यापासून मुंबईच्या दिशेने मोर्चा नेण्याची तयारी सुरू आहे. हाके हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून कार्यकर्त्यांसह पुढे जात असल्याचे सांगण्यात आले.

ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये, ही या आंदोलनामागील प्रमुख मागणी आहे. राज्यातील ओबीसी समाजाने मोठ्या संख्येने पाटस येथे पोहोचावे, असे आवाहन हाके यांनी केले होते. त्यानुसार विविध भागांतून कार्यकर्ते येथे जमा झाल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्याने हाके यांनी नाराजी व्यक्त केली. आम्ही कोणतेही शस्त्र किंवा धोकादायक वस्तू घेऊन मुंबईला जात नसून आपल्या आरक्षणाच्या हक्कासाठी आंदोलन करत असल्याचे त्यांनी म्हटले. गरज पडल्यास पोलिसांनी अटक करावी, पण आंदोलन थांबवणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

दरम्यान, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे राज्यातील आरक्षणाचा विषय आधीच चर्चेत आहे. अशा परिस्थितीत ओबीसी समाजाकडूनही मोठ्या आंदोलनाची तयारी सुरू झाल्याने प्रशासनासमोर नवे आव्हान निर्माण झाले आहे.

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा मुंबईकडे नेण्याच्या भूमिकेवर हाके ठाम आहेत. त्यामुळे पुढील काही तासांत पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते आणि मोर्चाला कशा प्रकारे प्रतिसाद दिला जातो, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News