इम्रान आत्तार
भोर,ता.४: वारंवार विनंती अर्ज करूनही भौतिक सुविधा मिळत नसल्याने स्वप्नलोक गृहनिर्माण सोसायटीतील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नगरपालिकेने सुविधा पुरवाव्यात, अन्यथा आम्ही सोसायटीतील सदनिका मालक पालिकेचा कर भरण्यास बांधील नाही, असे पत्र मंगळवारी (ता.
4) नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना सोसायटीच्या वतीने देण्यात आले.
सोसायटीमध्ये 334 सदनिका असून नगरपालिकेकडून कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत नाहीत. वारंवार विनंती, अर्ज करून व समक्ष भेटूनही आमच्या कोणत्याही अर्जाचा विचार केला नाही. सोसायटीकडून आपल्या नगरपालिकेचा कर वसूल केला जातो. मात्र, पिण्याचे पाणी व कचरा गाडी सोडली तर नगरपालिकेकडून सोसायटीमध्ये कोणतेही काम केले जात नाही.
दोन दिवसांतून एकदा तासभरच पाणी येते. ते पाणी 334 कुटुंबांना कसे पुरवायचे, यासंदर्भात वारंवार चर्चा करूनही तो प्रश्न सोडवला गेला नाही. जर आमच्या समस्या सोडवल्या गेल्या नाहीत, तर कोणताही कर भरण्यास सदनिका मालक बांधील नाहीत, हे तुम्हाला लेखी स्वरूपात सादर करत आहोत.
तसेच, आपण पुरवत असलेले तुटपुंजे पाणी व कचरा गाडी या सुविधादेखील आम्हाला नकोत. आम्ही आमच्या स्वखर्चाने त्या सोडवण्यास समर्थ आहोत, असे नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना सोसायटीतील महिलांसह सभासद उपस्थित होते.
सोसायटीमधून जाणारा रस्ता रात्री बंद ठेवण्यासाठी मागितली परवानगी
स्वप्नलोक सोसायटीमधील 5 सदनिकांमध्ये 1 ऑगस्ट रोजी पहाटे चोरी झाली असून, सोसायटीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून व भविष्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोसायटीच्या हद्दीमधून भोर एसटी डेपोकडे जाणारा रस्ता रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत इतर वाहनांसाठी बंद ठेवण्यासाठी परवानगी मिळावी, असे निवेदन भोरचे तहसीलदार यांना देण्यात आले. या निवेदनाची प्रत नगरपालिका व पोलीस ठाण्याला देण्यात आली.

