लोणी काळभोर, ता. ४ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी (ता. ३) सायंकाळी घडलेल्या थरारक प्रकाराने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पाटस (ता. दौंड) येथील माजी सरपंचाच्या मुलाने भरधाव वेगाने फॉर्च्युनर वाहन चालवत शेवाळवाडी ते थेऊर फाटा या दरम्यान समोर येईल त्या वाहनांना धडक देत अक्षरशः धुमाकूळ घातला.
या बेफाम वाहनचालकाने १० ते १५ हून अधिक वाहनांना धडक दिल्याची माहिती समोर आली असून, लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी प्रसंगावधान राखत थेऊर फाटा येथे वाहतूक कोंडी करून त्याला मोठ्या शिताफीने पकडले.
या प्रकरणात राजवर्धन युगंधर शितोळे (रा. पाटस, ता. दौंड, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले. ही धाडसी कारवाई लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या महिला पोलीस हवालदार आरती खलसे, महिला पोलीस नाहीद शेख, पोलीस हवालदार विवेक जगताप आणि ट्रॅफिक वॉर्डन सागर राऊत यांनी केली.
या बेफाम वाहनचालकाच्या धडकेत तीन जण गंभीर, तर तीन ते चार जण किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. लोणी काळभोर येथील गंगा गणेश कुंभार या गंभीर जखमी झाल्या असून, कवडीपाट टोलनाक्याजवळ एका महिला व तिच्या लहान मुलीलाही दुखापत झाली आहे. तसेच इतर काही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शेवाळवाडी परिसरात फॉर्च्युनर (गाडी नं MH 14 GA 6565) वाहनाने एका पोलिसाच्या वाहनालाही धडक दिली. त्यानंतर हे वाहन पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने भरधाव निघाल्याची माहिती महिला पोलीस हवालदार आरती खलसे व महिला पोलीस नाहीद शेख यांना मिळाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तातडीने पोलीस हवालदार विवेक जगताप व ट्रॅफिक वॉर्डन सागर राऊत यांच्या मदतीने थेऊर फाटा येथे वाहतूक नियंत्रित करत वाहनाला अडवण्याची योजना आखली.
दरम्यान, राजवर्धन शितोळे हा मार्गातील १० ते १५ वाहनांना धडक देत पुढे जात होता. मात्र, लोणी काळभोर वाहतूक पोलिसांनी आखलेल्या रणनीतीत तो अडकला. वाहन थांबवल्यानंतरही तो गाडीतून बाहेर येण्यास तयार नव्हता. अखेर महिला पोलीस हवालदार आरती खलसे आणि महिला पोलीस नाहीद शेख यांनी धाडस दाखवत त्याला वाहनाबाहेर काढले आणि लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात दिले. लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या या धाडसी कारवाईमुळे आणखी मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे. वेळेत कारवाई झाली नसती, तर हा बेफाम वाहनचालक पाटसपर्यंत अनेक वाहनांना धडक देत आणखी मोठी दुर्घटना घडवू शकला असता.
वाहनचालक राजवर्धन शितोळे याने मद्य किंवा अन्य कोणत्याही अमली पदार्थाचे सेवन केले होते का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसून, याबाबतचा तपास सुरू आहे. तपासानंतरच यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. या घटनेमुळे पाटसच्या माजी सरपंचाच्या मुलाच्या बेफिकीर कृत्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. प्रभावशाली कुटुंबातील व्यक्तींनी कायद्याचे पालन करण्याऐवजी अशा प्रकारे नागरिकांच्या जीवाशी खेळणे अत्यंत संतापजनक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

