मुंबई: विरारमध्ये पती दुसऱ्या पत्नीला घेऊन घरी आल्याने पहिल्या पत्नीचा संताप अनावर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाद वाढल्यानंतर पहिल्या पत्नीने दुसऱ्या पत्नीवर चाकू आणि त्रिशूळाने हल्ला केल्याचे समोर आले.
या घटनेत 22 वर्षीय कोमल सरोज गंभीर जखमी झाली. मात्र, जखमी अवस्थेत कोमलने पोलिसांच्या 112 हेल्पलाईनवर संपर्क साधल्याने पोलिसांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून तिची सुटका केली.
ही घटना विरारमधील मे फेअर गार्डन परिसरात घडली. लक्ष्मी प्रसाद (31) ही महिला पतीसोबत येथे राहत होती. दरम्यान, तिच्या पतीने जुलै 2026 मध्ये कोमल सरोजसोबत दुसरा विवाह केला. विशेष म्हणजे, या विवाहाची माहिती पहिल्या पत्नीला देण्यात आली नव्हती.
रविवारी पती अचानक कोमलला घेऊन घरी पोहोचला. दुसऱ्या पत्नीला पाहताच लक्ष्मी संतापली आणि दोघींमध्ये जोरदार वाद सुरू झाला. परिस्थिती चिघळल्यानंतर लक्ष्मीने घराचा दरवाजा आतून बंद केल्याचे सांगण्यात येते.
यानंतर तिने कोमलवर चाकू आणि त्रिशूळाने हल्ला केला. हल्ल्यात जखमी झालेली कोमल जीव वाचवण्यासाठी बेडरूममध्ये गेली. तेथून तिने तातडीने 112 या पोलिस हेल्पलाईन क्रमांकावर फोन करून मदत मागितली.
माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घराचा दरवाजा तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला आणि जखमी कोमलला बाहेर काढले. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिची प्रकृती स्थिर असून उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी बोळींज पोलिसांनी लक्ष्मी प्रसाद हिला अटक केली आहे. तिला वसई न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. आरोपी महिलेविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

