बारामती: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्याविरोधात काँग्रेसने ॲड. आकाश मोरे यांना मैदानात उतरवून अनपेक्षित 'ट्विस्ट' आणला आहे. ही निवडणूक केवळ राजकीय लढाई नसून, यात पवारांशी असलेले जुने ऋणानुबंध, निष्ठा आणि संघर्षाचा एक मोठा इतिहास दडलेला आहे.
आकाश मोरे यांना कॉंग्रेस विचारधारेचा वारसा वडील विजयराव मोरे यांच्याकडून लाभला आहे. 83 वर्षांच्या विजयराव मोरेंचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. 1967 मध्ये ते शरद पवारांविरुद्ध एका विडी कामगाराला निवडणुकीत उतरवले होते. पुढे 1990 मध्ये शरद पवारांनीच त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून पाठवले. मात्र, 1999 मध्ये जेव्हा पवारांनी काँग्रेस सोडून राष्ट्रवादीची स्थापना केली, तेव्हा विजयराव मोरेंनी पवारांसोबत न जाता काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, आजही त्यांचे शरद पवारांशी अत्यंत सलोख्याचे संबंध आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत याच मोरे पिता-पुत्रांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठी आणि विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांसाठी हिरिरीने प्रचार केला होता. मात्र, आता पोटनिवडणुकीत त्यांनी थेट सुनेत्रा पवारांसमोर शड्डू ठोकला आहे. बारामतीत काँग्रेसचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी मोरेंनी घेतलेली ही भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
दुसरीकडे, शरद पवार गटाने ही निवडणूक ‘बिनविरोध’ व्हावी अशी भूमिका घेतली आहे. अशा स्थितीत, जुन्या मैत्रीचा धागा पकडून शरद पवार स्वतः मोरेंना माघार घेण्यासाठी शब्द टाकणार का? हा आता सर्वात मोठा प्रश्न आहे.

