Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ? ऑगस्टमध्ये आढळले 31 रुग्ण; नागरिकांची चिंता वाढली

पिंपरी-चिंचवडमध्ये स्वाईन फ्लूचा धुमाकूळ? ऑगस्टमध्ये आढळले 31 रुग्ण; नागरिकांची चिंता वाढली

पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सव आणि सणासुदीची लगबग सुरू असतानाच पिंपरी-चिंचवड शहरातून आरोग्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

जानेवारीमध्ये 1, जुलैमध्ये 5 तर ऑगस्ट महिन्यात तब्बल 31 रुग्ण आढळले आहेत. सध्या सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असल्याने नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

गणेशोत्सवाच्या काळात बाजारपेठा, सार्वजनिक कार्यक्रम आणि इतर ठिकाणी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, गरज असल्यास मास्कचा वापर करावा आणि वारंवार हात स्वच्छ धुवावेत, असा सल्ला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला आहे.

स्वाईन फ्लू हा H1N1 विषाणूमुळे होणारा श्वसनाशी संबंधित संसर्ग आहे. संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यातून बाहेर पडणाऱ्या थेंबांमुळे त्याचा प्रसार होऊ शकतो. दूषित वस्तूला स्पर्श केल्यानंतर नाक, तोंड किंवा डोळ्यांना हात लावल्यानेही संसर्ग होण्याची शक्यता असते.

सर्दी, ताप, घसा खवखवणे, खोकला, नाक वाहणे, डोकेदुखी आणि थकवा ही सामान्य लक्षणे दिसू शकतात. काही रुग्णांमध्ये श्वास घेण्यास त्रास किंवा न्यूमोनियासारखी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मधुमेह, हृदयविकार, श्वसनाचे आजार किंवा इतर दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. लक्षणे जाणवल्यास स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News