Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पोलीस दलात खळबळ! कोठडीत मारहाण करून तरुणाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना जन्मठेप; न्यायालयाचा दणका

पोलीस दलात खळबळ! कोठडीत मारहाण करून तरुणाचा जीव घेणाऱ्या 9 पोलिसांना जन्मठेप; न्यायालयाचा दणका

वाशिम : वाशिम जिल्ह्यातील गाजलेल्या कोठडी मृत्यू प्रकरणात तब्बल 15 वर्षांनंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी 9 पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या निकालानंतर राज्यभरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली आहे.

वाशिम जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निर्णय दिला. रिसोड पोलिस ठाण्यात चोरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या बेग्या पवार यांचा 10 मे 2011 रोजी पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. न्यायालयाने सादर करण्यात आलेले पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब ग्राह्य धरत संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवले.

बेग्या पवार हे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा गावचे रहिवासी होते. ते पारधी समाजातील होते. त्यांच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नव्हता. कोठडीतील मृत्यूनंतर या घटनेची चौकशी सुरू झाली आणि दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर अखेर या प्रकरणाचा निकाल लागला.

या प्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षक महादेव माणिक धांडे यांच्यासह मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिराम जाधव या एकूण 9 पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. सीआयडीने 34 दिवसांत तपास पूर्ण करून संबंधित पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा आणि विशेष अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर बेग्या पवार यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त करत, अनेक वर्षांच्या न्यायलढ्याला अखेर यश मिळाल्याची भावना व्यक्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Pune Prime News